कावली वसाड : माणसांप्रमाणे पशूपक्ष्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे जंगलात राहणाऱ्या प्रत्येक जिवाला संरक्षण मिळाले आहे. मात्र, वन्यपशूंच्या शिवारातील वाढत्या संख्येमुळे शेतकऱ्यांचे जीवन असुरक्षित झाले आहे.
एकीकडे पाऊस थांबल्यामुळे शेतात टाकलेले बियाणे माकडे, रोही, रानडुक्कर आदी वन्यपशू खात आहेत. त्यांच्यापासून संरक्षण व्हावे, यासाठी शेतकरी धडपडत आहेत. कितीही बंदोबस्त केला तरी केला तरी रानडुक्कर शेतात घुसून बियाणे व निघालेली रोपे खातात. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण शेतातील पीक जमीनदोस्त करतात. आता मात्र ते गावात शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. दाभाडा तसेच कावली भागातील शेतकरी-शेतमजुरांना शेतात काम करीत असताना रानडुकरांकडून जखमी करण्यात आल्याच्या घटना घडल्या. परंतु, त्यांच्या बंदोबस्ताकडे वनविभागाने लक्ष दिलेले नाही. हरीण, निलगाय यांसारखे प्राणी मोसंबी, संत्र्याची फळबाग नष्ट करीत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.
-------------------
फटाक्यांचा आवाज झाला परिचित
अनेक शेतकऱ्यांनी शेताला तारेचे कुंपण केले. विजेचा धोका लक्षात घेऊन सौर ऊर्जाधारित करंट मशीनचा वापर केला. काही शेतकऱ्यांनी कॅल्शियम कार्बोनेटच्या खड्यांची बंदूक वापरली. काही दिवस त्याच्यातून होणाऱ्या मोठ्या आवाजाने वन्यप्राणी घाबरले, पण या आवाजाचा त्यांना आता सराव झाला आहे. त्यामुळे जागलीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागते.
-------------------तूर फस्त
शेतकऱ्यांनी यावर्षी तूर या पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवड झाली आहे. त्यांनी शेतातून पाय काढताच रानडुकरांनी बियाणे उकरून फस्त केल्याचे चित्र परिसरात आहे.
--------------------
चोरट्यांचा धुमाकूळ
शेतात झोपडी बांधून तेथे ठेवलेले साहित्य शिवारात भुरट्या चोऱ्या करणाऱ्या चोरांचे लक्ष्य बनत आहेत. एवढेच नव्हे तर वन्यप्राण्यांना घाबरवण्यासाठी लावलेली झटका मशीनदेखील ते चोरून नेत आहेत.