अमरावती: जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला शासनाकडून योग्य हमीभाव मिळावा यासाठी शहरातील नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग अडविला. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत जोरदार नारेबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने काही तासांसाठी वाहतूक खोळंबली होती.
देशातील केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी विरोधी असून, शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे आणून शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. एकीकडे शेतकरी शेतात दिवसरात्र राबवून शेती करतो. परंतु तरीही त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा तसेच संपूर्ण कर्जमाफीच्या प्रमुख मागण्यासाठी अमित अढाऊ यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून शासनाचा निषेध केला. या आंदोलनामध्ये महिला शेतकरीही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.
यावेळी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर बसून शासनाविरोधात नारेबाजी केल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी महामार्ग अडविणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला. पोलिसांनी जवळपास १७ आंदोलकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. या आंदोलनात अमित अढाऊ, स्वप्नील कोठे, जीवन हटवार, भूषण कांडलकर, प्रफुल्ल उमरकर, पिंटू तायवाडे, कलीम सौदागर, राधिका देशमुख, प्रणित शेकार, गोपाल चोपडे, अमूल ढोके, कुंदन काळे, प्रेम जवंजाळ, अनिल पवार, उज्ज्वल कुचे, जीवन हिवसे मंगेश कडू, संगीता देवतळे, बाळासाहेब पाचघरे, गजानन चौधरी, अमित पोकळे, निखिल टोपले, तुषार खवले, नितीन पाचघरे, अंकुश ठाकरे यांचा सहभाग होता.