लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरिपाच्या पेरणीसाठी आधार होणार म्हणून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. मात्र, मार्चपासून सुरू झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादनात घट आली आहे. त्यातच बाजारात दोन आठवड्यांत भावही उतरले असल्याने शेतकऱ्यांच्या ‘मालामाल’ स्वप्नाचा भंग झाल्याचे दिसून येते. खरिपाचे प्रमुख पीक म्हणून सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती आहे. यंदा देखील २.६५ लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाद्वारे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामध्येही किमान दहा हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय ५७८ हेक्टरमध्ये उन्हाळी सोयाबीनची पेरणी जिल्ह्यात करण्यात आलेली होती. पीक चांगले दिसत असताना शेंगा लागण्याचे प्रमाण कमी असल्याने सरासरी उत्पादनात कमी आलेली आहे. काही शेतकऱ्यांनी खरिपासाठी बियाणे म्हणून राखून ठेवले, तर काहींनी भाव चांगला येईल या आशेने बाजारात विकायला आणले. पण ओलसरपणा आहे म्हणून कमी भावात मागणी केली जात असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. तसे पाहता शेतकऱ्यांचा शेतमाल निघताच ऐन हंगामात शेतमालाचे भाव व्यापाऱ्यांद्वारे पाडले जातात. आताही हरभऱ्याची शासकीय खरेदी बंद झाल्यानंतर बाजार समित्यांमध्ये आवक वाढली असता, २०० ते ३०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलमागे भाव पाडल्याचे या आठवड्यात दिसून आले आहे.
जिल्ह्यात ५७८ हेक्टरमध्ये पेरा जिल्ह्यात ५७८ हेक्टरमध्ये उन्हाळी सोयाबीनची यंदा पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक २१३ हेक्टर क्षेत्र पेरा चांदूर रेल्वे तालुक्यात आहे. याशिवाय अमरावती १७, भातकुली ११, नांदगाव खंडेश्वर १००, तिवसा ६५, चांदूर बाजार १२, दर्यापूर ५, धारणी २ व चिखलदरा तालुक्यात ४ हेक्टरचा समावेश आहे.
ओलसरपणामुळे घसरला भावव्यापाऱ्यांद्वारा उन्हाळी सोयाबीनमध्ये ओलसरपणा असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात ४२ ते ४४ अंश तापमानात एका दिवसात सोयाबीनमधील आर्द्रता निघून जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. फक्त भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांद्वारे एक ना अनेक कारणे सांगण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
१० हजारांवरून सहा हजारांवर भाववर्षभरापूर्वी याच वेळेला सोयाबीनचा दर १० हजार रुपये क्विंंटलवर गेला होता व त्यानंतर दरामध्ये सातत्याने कमी येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीला वाढती मागणी व सोयाबीन उत्पादनात देशांतर्गत कमी, याशिवाय अन्य कारणे आहेत, यंदा सोयाबीन व कापसाचे उत्पादन कमी झाल्याने वाढती मागणी आहे.
एक प्रयोग म्हणून पहिल्यांदा उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. उत्पादन खर्च कमी असल्याने पेरायला हरकत नाही. उष्णतेच्या लाटेमुळे शेंगा कमी लागल्याने उत्पन्नात कमी आलेली आहे. खरिपासाठी बियाणे म्हणून राखून ठेवले आहे.-अतुल चव्हाण, शेतकरी
आयात कर माफ केला असल्याने सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात कमी आलेली आहे. त्यामुळे तेलाच्या भावातही घसरण झाली आहे. उन्हाळी सोयाबीनची प्रतवारी कमी आहे व जिल्ह्यात पेरणी क्षेत्रही कमी असल्याने फारसे विक्रीला येत नाही.-अमर बांबल, अडते