कावली वसाड :
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सर्वदूर दिसून येत आहे.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी त्याची पर्वा न करता शेतकरी, शेतमजूर शेती मशागतीच्या कामात गुंतून गेला आहे.
शेतातील काडी कचरा, तुरीचे फणे, प-हाटी तसेच गव्हाचे उभे असलेले झाडे पेटविण्यात शेतकरी व्यस्त झाला आहे. यावर्षी मजुरीचे दर वाढले आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याने काही शेतमजूर घराच्या बाहेरच पडत नसल्यामुळे अन्य जणांकडून अधिक मजुरी देऊन शेतीची कामे करून घ्यावी लागत आहेत. गत वर्षी शेती तयार करण्यासाठी जो खर्च लागत होता, त्या खर्चात मात्र दुपटीने वाढ झाली आहे. एक एकर शेती तयार करण्यासाठी नांगरणी, वखरणी अल्प प्रमाणात होती. यावर्षी मत सर्व शेतीची मशागत यंत्राच्या साह्याने करावी लागत असल्याने ट्रॅक्टरचे दर वाढले आहे. डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ट्रॅक्टरचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेती पेरणीसाठी तयार करणे ही तारेवरची कसरत झाली आहे.