अमरावती - अमरावती जिल्ह्यात शेतीतज्ज्ञ म्हणून प्रख्यात असलेले माजी सरपंच व बाजार समितीचे संचालक अरुण महल्ले (६२) यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन सोमवारी सायंकाळी आत्महत्या केली. त्यांच्यावर तीन लाखांचे कर्ज होते. अरुण महल्ले यांनी १५ एकर शेतावर तीन लाखांचे कर्ज घेतले होते. कर्जमाफीचा आॅनलाईन अर्जही त्यांनी भरला होता. यंदा कमी पाऊस व उत्पादन कमी होणार यांची त्यांना जाणीव झाली होती. यामुळे आपण जीवन संपवू शकतो, असे त्यांनी पत्नी चंदा यांना मृत्यूपूर्व सांगितले होते. सोमवारी सायंकाळी धामणगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला अमरावती- जबलपूर रेल्वेगाडी येत असताना त्यासमोर उडी घेऊन आत्महत्या केली. एका विचारवंत शेतक-याने आत्महत्येसारखे पाऊल उचलल्यामुळे धामणगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्जामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले असे त्यांचे पुतणे सचिन महल्ले यांनी सांगितले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण महल्ले हे शेतीसंदर्भातील सखोल माहिती ठेवणारे तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ते स्वत:च शेती करीत असल्यामुळे पेरणी, फवारणी, डवरणी, निंदण यासर्व बाबींची माहिती देऊन शेतक-यांना किती फायदा होऊ शकतो, याची आकडेवारीसह मार्गदर्शन करीत होते. त्यांनी दिघी (महल्ले) ग्रामपंचायतीचे १० वर्षे सरपंचपद सांभाळले. यासोबतच शेतक-यांचे प्रतिनिधी म्हणून धामणगाव बाजार समितीमध्ये संचालक होते.
शेतक-यांचे मार्गदर्शक अरुण महल्ले यांची आत्महत्या, धामणगाव तालुक्यातील शेतक-यांत हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 5:01 PM