- प्रभाकर भगोले चांदूररेल्वे (अमरावती) : विदर्भातील शेतक-यांनी शांत न राहता शेतमालाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागले, याशिवाय सरकारला जाग येणार नाही. शेतमालाला किफायतशीर भाव मिळवायचा असेल तर सरकाशी दोन हात करण्याची तयारी सुरू करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते चांदूर बाजार तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथे हजारो शेतक-यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या दुष्काळ परिषदेत बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढावू, प्रवीण मोहोड, अंकूश कडू, अतुल ढोके, नगरसेवक बच्चू वानरे, पूजा मोरे, आशिष वानखडे, संजय ठाकरे, आशिष वानखडे उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतक-यांचा दाखला देत राजू शेट्टी म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी ऊस आंदोलन करताना छातीवर गोळ्या झेलण्यासाठी आम्ही तयार होतो. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी देवाची मदत ही अपेक्षा बाळगून आहे. याचमुळे सरकार विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय करीत आहे. महाराष्ट्रात अद्याप सन १९५५ च्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. शेतमालाचे किमान भावाची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची आहे. त्यानुसार बाजारभाव कितीही खाली आला तरी सरकारला योग्य हमी शेतक-याच्या शेतीमालाला द्यावाच लागेल. मात्र, आपण शेतकरी भाजप नेत्याच्या भुलथापांना बळी पडलो, असेही खासदार शेट्टी म्हणाले.
पाठीत खंजीर खुपसला भाजपा सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती केली व आम्हीही त्यांना पाठिंबा जाहीर केला. परंतु, शेतक-याच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भूमिका फडणवीस सरकारने घेतल्याने आम्ही सरकारचा सातत्याने विरोध करीत आहोत, असे वस्त्रोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र तुपकर म्हणाले.