वनोजा बाग (अमरावती) : शासनाने दिलेली आश्वासाने फसवी आहेत. दिवाळीपूर्वी शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी यांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी तालुक्यातील ग्राम भंडारज येथे शेतकऱ्यांनी सोमवार २४ ऑक्टोबर दिवाळीला अन्नत्याग आंदोलन करून निषेध नोंदविला.
राज्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा, लिंबू, केळी, मुंग, उडीद, तूर पिकांचे पूर्णतः नुकसान झाले. या सर्व पिकांचे शासनाने पंचनामे करून दिवाळीपूर्वी पिकांची नुकसानभरपाई व स्वस्त धान्य दुकानामार्फत आनंदाचा शिधा वाटप करून शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही साजरी करणार, असे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र हे आश्वासन कागदावरच राहिले. पिकाचा दाणाही शेतकऱ्याच्या घरात गेला नाही. परिणामी शेतकऱ्यांचे जीवन पूर्णतः उद्ध्वस्त झाले. अनेक निवेदनांतून शेतकऱ्यांनी वारंवार नुकसानभरपाईची मागणी केली; परंतु तरीही त्यांच्यावर दिवाळीच्या दिवशी उपाशी राहण्याची वेळ आली. आठ ते दहा दिवसांमध्ये ही समस्या निकाली न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
अधिवेशनात प्रश्न मांडू
शासनाच्या शेतकऱ्यांप्रति असलेल्या उदासीन धोरणाचा हा प्रतीकात्मक निषेध आहे. दिवाळीपूर्वी मदत मिळणे गरजेचे होते. माझा या आंदोलनाला पाठिंबा असून, हा विषय विधिमंडळात मांडला जाईल.
- बळवंत वानखडे, आमदार
आठ दिवसांत मिळेल मदत
पावसामुळे झालेले नुकसान व आनंदाचा शिधा ही दोन्ही आश्वासने दिवाळीपूर्वी सरकारने पूर्ण करावयाची होती. परंतु, काही कारणास्तव ती पूर्ण होऊ शकली नाही. येत्या आठ-दहा दिवसांत ही आश्वासने पूर्ण होतील.
- रमेश बुंदीले, माजी आमदार