मोहन राऊत /धामणगाव रेल्वे (अमरावती) : शेतात सायंकाळी गेलेल्या एका शेतकऱ्याची वाघाने शिकार केली असून, केवळ पोलिसांना सदर शेतकऱ्याचे मुंडके मिळाले आहेत. अर्धे गाव शेतशिवारात रात्री ११ वाजेपर्यंत त्याचा शोध घेत होते. ही घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगिर येथे रात्री १०.३० च्या सुमारास उघड झाली.
राजेंद्र देविदास निमकर (४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गावापासून आठ किलोमीटर अंतरावर राजेंद्र यांचे शेत आहे. सायंकाळी ते शेतात गेले असता, रात्र होऊनही परत न आल्यामुळे राजेंद्रचे चुलतभाऊ जि.प . सदस्य सुरेश निमकर हे त्यांना पहाण्यासाठी गेले. मात्र, शेतात राजेंद्राची अंडरवियर व बनियान दिसली. काही अंतरावर केवळ मुंडके दिसले. वाघाच्या पावलांचे ठसे पहायला मिळाले. देवळी भागातील वाघ य़ा परिसरात आल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती.
शुक्रवारी वाघाने शेतकऱ्याची शिकार केल्याने अर्धे गाव शेतशिवारात दाखल झाले होते. मंगरूळ दस्तगिरचे पोलिस निरीक्षक विवेकानंद राऊत यांनी माहिती दिली की मृत राजेंद्र निमकर यांचे केवळ मुंडके आम्हाला मिळाले. वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिया कोकाटे घटना स्थळी रवाना झाले आहेत.