कावली वसाड : धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली येथील प्रगतिशील शेतकरी प्रशांत भोयर यांनी वांगी या पिकाला भाव नसल्यामुळे दीड एकर शेतात जनावरे सोडली.
गतवर्षी प्रशांत भोयर यांनी भाडेतत्त्वावर शेती केली. दीड एकरात भाजीपाला पिकांची पेरणी केली. इतर पिकांपेक्षा वांग्याचे पीक घेतले, तर लग्न प्रसंगाच्या हंगामावर योग्य दर मिळेल, या अपेक्षेने त्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला. परंतु, एकीकडे कोरोना संसर्गाच्या आगमनाने बाजार पडला, तर दुसरीकडे वांगी या पिकावर अनेक रोगांनी आक्रमण केले. महागडी फवारणी केल्यानंतरही ज्यावेळी दर तेजीत होते, त्यावेळी वांगी उपलब्ध झाली नाहीत. आता वांगी झाडाला मोठ्या प्रमाणात लागत असताना, पाहिजे त्या प्रमाणात मोबदला मिळत नसल्याची व्यथा प्रशांत भोयर यांनी मांडली आहे. व्यवस्थापनाचा खर्च उत्पन्नापेक्षा जादा होत असल्याने वांग्याच्या शेतात जनावरे सोडली असल्याचे त्यांनी सांगितले.
-----------
पीक झाले डोक्याला ताप
सद्यस्थितीत २० किलो वांगी केवळ वीस रुपयांना विकली जात असतील, तर त्याचा दर प्रतिकिलो रुपया एवढाच होतो. यात जाण्यायेण्याचा खर्च सोडाच, तोडणीचा खर्चही निघत नाही, असे भोयर यांनी सांगितले.