सुभाष पाळेकर : नैसर्गिक शेतीवर मार्गदर्शन दर्यापूर : अलीकडच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत चाललाय. ‘झीरो बजेट’शेतीचा पर्याय निवडल्यास शेतकरी आत्महत्या हमखास थांबतील. नैसर्गिक शेतीला साडेदहा हजार वर्षांचा इतिहास आहे. आजच्या काळात झीरो बजेट शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पद्श्री सुभाष पाळेकर यांनी केले. लोकनेत्या कोकिळाबाई गावंडे यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात रविवारी आयोजित ‘झीरो बजेट’ नैसर्गिक शेती या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेला त्यांनी संबोधित केले. सर्वप्रथम बाबासाहेब सांगळुदकर, कोकिळाबाई गावंडे (सांगळुदकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसीलदार राहुल तायडे यांनी कार्यशाळेचे उदघाटन केले. अकोटचे आ. प्रकाश पाटील भारसाकळे यांनीही कार्यशाळेला भेट दिली. पाळेकर पुढे बोलताना म्हणाले, देप्रथमच एका शेतकऱ्याला कोणत्याही नामांकनाविना शासनाने पद्मश्री बहाल केली. हा सन्मान आपला नसून तोे दशातील ८० कोटी शेतकऱ्यांचा आहे. ‘झीरो बजेट’ नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत केल्यास जमिनीची सुपिकता वाढेल, असेही पाळेकर पुढे म्हणाले. जे. डी. पाटील सांगळूदकर स्मृती केंद्राच्यावतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.माजी मंत्री जगदीश गुप्ता, बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील बरवट, उपसभापती नरेंद्र ब्राम्हणकर, संचालक कुलदीप गावंडे, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्ष कांचनमाला गावंडे, जे.डी.पाटील सांगळुदकर स्मृती केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण गावंडे तसेच बाजार समिती संचालक व काही निवडक शेतकऱ्यांच्या हस्ते सुभाष पाळेकर यांना मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला. आले. याप्रसंगी माजी मंत्री जगदीश गुप्ता, कांचनमाला गावंडे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी झीरो बजेट शेती यशस्वीरीत्या करणारे शेंडगाव येथील शेतकरी श्रीकृष्ण बनसोड यांचा पाळेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक कुलदीप पाटील गावंडे यांनी केले. सूत्रसंचालन गजानन हेरोळे तर आभार प्रदर्शन कुलभूषण गावंडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय देवलाल आठवले यांनी करून दिला. त्यानंतर शेतकऱ्यांनी झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. (प्रतिनिधी)
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘झीरो बजेट’ शेती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 12:05 AM