मांजरखेड कसबा : चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्याने डौलदार पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांनी सुखावला आहे. १७ ऑगस्टला कोसळलेल्या मुसळधार पावसानंतरही रिपरिप सुरू असल्याने पिकांना पोषक ठरत आहे. त्यापूर्वी पंधरवड्यापासून पाण्याचा थेंबही पिकांना मिळालेला नव्हता.
मांजरखेड, बासलापूर गावातील पाण्याअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर होती. शेतातील वीजबिल माफ होईल, असा मध्यंतरी कयास लावला जात होता. पण, तेही झाले नाही. गावातील शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीन, तूर, कपाशी अशी विविध पिके पेरली आहेत. पेरणीनंतर अचानक पाणी गायब झाल्याने शेतकरी शेतात जाणेही टाळत होते. त्यातच विविध वन्यप्राणी शेतात जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. शेतीला लावलेला पैसा बुडतो की काय, अशी अवस्था असताना पिकांना दिलासा मिळाला आहे.