चांदूररेल्वेत संताप : मुद्दा तूर खरेदीचा, मीनाकुमारीचा काढता पायचांदुररेल्वे : बाजार समितीच्या नाफेड केंद्राला अचानक भेट देणाऱ्या व्यवस्थापकीय संचालक मीना कुमारी यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. तूरविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. अवघ्या १५ मिनिटांच्या भेटीनंतर त्यांनी बाजार समितीमधून काढता पाय घेतला.चांदूररेल्वे बाजार समितीमध्ये नाफे डद्वारा तूर खरेदी सुरू आहे. मुदतवाढीनंतर शनिवार १५ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान शासनाने सोमवारपासून तूर खरेदी पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, सोमवारी बाजार समितीमध्ये नाफेडचे ग्रेडर आले नसल्याने गोंधळ उडाला होता. एसडीओ ललितकुमार वऱ्हाडे यांनी शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन व शासनाच्या आदेशांचा आधार घेत नाफेडच्या ग्रेडरवर फौजदारी कार्यवाही करण्याचे कळविले होते. मंगळवारी दुपारी नाफेडच्या मुंबई केंद्रीय व्यवस्थापकीय संचालक मीना कुमारी यांनी अचानक चांदूररेल्वे बाजार समितीला भेट दिली. नाफेडच्या मोठ्या अधिकारी बाजार समितीमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळताच तूरविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालून समस्या विशद केल्यात. नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाल्यावर सुरूवातीला व्यापाऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात आली. जेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचा माल बाजारपेठेत आणला तेव्हा तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय झाला. याशिवाय चांगल्या तुरीला चाळणी मारून भाव कमी करण्यात येत आहे. नाफे डचे ग्रेडर मनमानी कारभार करीत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी यावेळी केला. बाजार समिती सभापती प्रभाकर वाघ यांनीही नाफेड कर्मचाऱ्यांची मीना कुमारी यांच्यासमोर खरडपट्टी काढली. यानंतर शेतकऱ्यांची तूर मोजणी वेगात सुरू झाली. मंगळवारी केवळ ५१४ क्विंटल तुरीची मोजणी झाल्याने मोजणीच्या गतीवरही आक्षेप घेतला जात आहे.कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मौननाफेडच्या निकषांनुसार ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्या शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी केला जाईल, असे मीनाकुमारी यांनी सांगितले. मात्र, डिसेंबर महिन्यात कोणताही निकष न लावता हजारो क्विंटल तुरीची खरेदी केली, त्याचे काय, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. नाफेड अधिकारी-कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही मीनाकुमारी यांनी मौन बाळगले होते.
नाफेडच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2017 12:08 AM