धामणगाव रेल्वे : यंदा खरीप हंगामातील उत्पादित सोयाबीन बियाणे ज्यांच्याकडे उपलब्ध आहे, त्यांनी तालुक्यातील कृषी सहायक यांच्याकडून तपासणी करून आगामी हंगामासाठी जतन करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर इंगोले यांनी केले आहे.
धामणगाव तालुक्यात सन २०२१-२२ या खरीप हंगामात अंदाजे २३ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवड होईल, असे गृहीत धरून तालुक्यात २७ हजार ३२५ क्विंटल बियाणे लागणार आहे. गतवर्षी कापणीच्या वेळी अधिक पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांकडे ४ हजार ७७२.९५ क्विंटल सोयाबीन बियाणे घरी साठविलेले असल्याचे निरीक्षणाअंती दिसून आले. स्थानिक पातळीवर सोयाबीन बियाणे जतन करून ठेवण्यासाठी तालुक्यातील कृषी सहायकांनी ६९ शेत शिवार, चावडी व सर्वच गावांत सभा घेऊन शेतकऱ्याना समजावुन सांगून आतापर्यंत जनजागृती केलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन बियाणे घरी साठवणुक करून ठेवलेले आहे, त्यांनी पुढील खरीप हंगामाकरिता बियाणे उपलब्ध करण्याकरिता हंगामापुर्वी सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी करून घ्यावी व त्यानंतर आपल्याच गावातील शेतकऱ्यांना हे बियाणे खरीप हंगामात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर इंगोले यांनी केले आहे.