गणोजा येथील घटना : कर्जाचा हप्ता थकल्याने निराशाअमरावती : फायनान्सवर घेतलेल्या चारचाकी वाहनाच्या थकित हप्त्यामुळे मानसिक तणावात येऊन शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भातकुली पोलीस ठाण्यांतर्गत गणोजा देवी येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. प्रशांत सुधाकर गुल्हाने (३५) असे मृताचे नाव आहे. प्रशांतचे वडील सुधाकर गुल्हाने यांच्या नावे गणोजा देवीजवळ दोन एकर शेती आहे. त्यांचा मुलगा प्रशांत वडिलांना शेतीच्या कामात मदतसुध्दा करीत होता. शेतीच्या कामासोबतच प्रशांतने एक चारचाकी वाहन माल वाहतूकीसाठी फायन्सासवर खरेदी केले होते. मालवाहतूक करून तो फायन्सासचे हप्ते भरत होता. त्यामुळे उत्पनाचा स्त्रोत वाढल्याने प्रशांतने आणखी दोन चारचारी वाहने फायन्सासवर खरेदी केले. त्यामुळे हप्ते भरण्याचा ताण प्रशांतवर वाढला. गेल्या काही महिन्यांपासून वाहनाचे हप्ते भरणे शक्य होत नसल्याचे पाहून प्रशांत मानसिक तणावात आला होता. त्याचेवर सुमारे २ लाखांपेक्षा अधिकचे कर्ज असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. याच मानसिक तणावातून सोमवारी रात्रीच्या सुमारास प्रशांतने घराच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी त्याचे कुटुंबीय झोपेतून उठल्यानंतर प्रशांत घराच्या आवारातील एका ठिकाणी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळून आला. या घटनेची माहिती भातकुली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येसंबंधित चौकशी सुरु केली आहे. प्रशांतच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व पत्नी असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे गणोजा देवी परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशांतच्या मृतदेहावर इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. (प्रतिनिधी)
शेतकरीपुत्राची आत्महत्या
By admin | Published: January 06, 2016 12:10 AM