अमरावती: सततच्या नैसर्गिक आपत्तीने पुरता खचलेला शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने हतबल झाला आहे. त्यावर उपाय म्हणून वैज्ञानिक प्रयोग व तंत्रज्ञानाचे ‘जुगाड’ याच्या परिणामी पीव्हीसी पाइपपासून कार्बाइड बंदूक तयार करण्यात आली. त्याची विक्री ग्रामीण भागात केली जात आहे.
वस्ती असो की शिवार, वन्यप्राणी आणि वानरांचा उच्छाद रोजचाच. गुरुदेवनगर, मोझरीचे रहिवासी या त्रासाने कमालीचे हैराण झाले आहेत. माकडे गावात येऊन अन्नधान्याची कमालीची नासाडी करतात. यावर उपाय म्हणून गोफण, गुल्लेर, रसायनमिश्रित गोळे, फटाक्यांसोबत आता भर पडली ती कार्बाइड बंदुकीची. अतिशय कमी खर्चात तयार करता येणाऱ्या बंदुकीतून स्ट्रोकचा मोठा आवाज वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यास पुरेसा आहे. या कार्बाइड बंदुकीचे अनेक विज्ञान प्रदर्शनात प्रात्याक्षिक करण्यात आले. शेतकऱ्यांची गरज ओळखून ती विकसित करण्यात आली. मागील आठवड्यात गुरुदेवनगरच्या आठवडी बाजारात चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडचे रहिवासी जया व चंद्रकांत काकडे हे दाम्पत्य कार्बाइड बंदूक घेऊन आले. प्रत्येकी २०० रुपयांत ते बंदुकीची विक्री करतात.
अशी आहे बंदूक पीव्हीसी पाईपच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या बंदुकीत पुढच्या भागातून कॅल्शियम कार्बाइडचे खडे टाकण्यात येतात. त्यावर बंदुकीच्या वरच्या भागाला असलेल्या छिद्रातून थोडेसे पाणी टाकले जाते. कॅल्शिअम कार्बाइड व पाण्यामध्ये रासायनिक अभिसरण होऊन त्यातून सिटिलीन वायूची निर्मिती होते. सोबत जोडलेल्या गॅस लाइटरचे बटन दाबताच त्यातून जोरदार धमाकेदार आवाजाची निर्मिती होते. यातून कुठल्याही प्रकारची जीवितहानी अथवा प्रदूषण होत नाही, हे विशेष.