पीक विम्याच्या परताव्याची मागणी, दर्यापुरातील शेतकरी झाले आक्रमक
दर्यापूर : तालुक्यात मूग व उडीद या पिकांसाठी विमा परतावा मंजूर झालेला असून सुद्धा तालुक्यातील दर्यापूर व थिलोरी या दोन महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना मूग या पिकाची विमा रक्कम अद्यापही मिळालेली नाही. उडीद या पिकाचा विमासुद्धा तालुक्यातील आठही महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या मुद्द्यावर मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी दर्यापूर तालुका कृषी कार्यालयाला घेराव घातला.
जोपर्यंत विमा कंपनी शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात लिहून देत नाही, तोपर्यंत शेतकरी कृषी कार्यालयातून हलणार नाहीत. आम्ही आंदोलन तीव्र करू, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या. कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकरी फोन करून पीक विम्याविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करताच ते योग्य माहिती देत नसल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.
बापूसाहेब साबळे, प्रवीण कावरे, अतुल गोळे, प्रमोद साखरे विनय गावंडे, शशांक धर्माळे, योगेश पावडे, श्याम धर्माळे, प्रमोद देशमुख, गोपाल कावरे, विनायकराव होले, साहेबराव नागे, प्रफुल्ल धर्माळे, अमोल ठाकरे, राहुल वाकपंजर, अमोल धर्माळे, ज्ञानेश्वर होले, महेंद्र राऊत यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
-------------------
१० कोटींहून अधिक रकमेची प्रतीक्षा
दर्यापूर तसेच थिलोरी महसूल मंडळातील ३८५१ शेतकऱ्यांना ७ कोटी ७३ लाख ४७ हजार ९२८ रुपये खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. उडीद पिकासाठी विमा तालुक्यातील आठही मंडळांतील ३६१५ शेतकऱ्यांना ३ कोटी ४१ लाख ७० हजार ८८९ रुपये अद्यापही प्राप्त झालेले नाहीत.
-------------------
विमा कंपनीकडून प्रतिसाद नाही
तहसीलदार योगेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्यांना योग्य प्रतिसाद देत नव्हते. अधिकाऱ्यांची हतबलता पाहून शेतकरी अधिकच आक्रमक झाले होते.