दर्यापूर : कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतांना शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याने दर्यापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी सायंकाळी ६ वाजता दरम्यान रस्त्यावर कापसाचे गठ्डे भरलेला ट्रॅक्टर आडवा लावत त्यामधील कापूस रस्त्यावर टाकून आपला संताप व्यक्त केला.
तालुक्यातील लखापुर येथील शेतकरीशेतकरी रणजित अशोकराव धर्माळे यांनी आपल्या शेतातून कपाशी वेचा करून कापूस थेट विक्रीसाठी दोन ते तीन दिवसांपासून बाजारपेठेत नेत होते. परंतु कापसाला समाधान कारक भाव नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने आपला कापसाने भरलेला ट्रॅक्टर रस्त्यावर आडवा लावून ट्रॉलीतील कापसाचे गठडे रस्त्यावर उघडून त्यातील कापूस रस्त्यावर टाकत ठिय्या दिला. यावेळी अनेक शेतकरी सुद्धा हा प्रकार पाहून यात सहभागी झाले होते.
दरम्यान दर्यापूरचे ठाणेदार संतोष ताले यांनी रस्त्यांवर वाहतुक खोळंबल्याने त्यांनी शेतकऱ्याला समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्याने आपला ठिय्या कायम ठेवल्याने वाहतुक पोलिसांनी शेतकरी रणजीत धर्माळे यांचा ट्रॅक्टर व ट्रॉली कपाशिसह पोलीस स्टेशन मध्ये नेऊन जमा केली. दरम्यान काही वेळानंतर शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.त्यानंतर रस्त्यावरील वाहतुक सुरळीत झाली. एकीकडे नापिकी,अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांचे अनोनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दुसरीकडे शेतमाला पुरेसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून येत आहे.
शेत मजुरांची मजुरी देण्यासाठी शेतातून थेट कापूस विक्रीसाठी जिनींग मध्ये विक्रीला नेली असता कापसाला योग्य भावच मिळत नसल्याने लावलेला खर्च अन मजूरीचे पैसे सुध्दा निघत नाही. शेतकऱ्याच्या कापसाला योग्य भाव मिळवा. रणजित धर्माळे, शेतकरी लखापूर.