यावर्षी अतिपावसामुळे शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात फटका बसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता. परंतु, शेतातील विहिरीला बऱ्यापैकी पाणी व अप्पर वर्धा धरणाचे ही सिंचन करण्याकरिता शेतकऱ्यांना पाणी मिळणाऱ्या या आशेवर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या पिकांना पसंती दिली. आता अवकाळी पावसाने आगमन केल्याने मोठा आर्थिक फटका बसल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांचा हरभरा निघाला असला तरी गहू मात्र अद्यापही शेतात आहे. अवकाळी पाऊस व वादळ आल्याने शेतकऱ्यांचा गहू पूर्णतः झोपला असल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
कांदा, लसूण या पिकांवरही अवकाळी पावसाने संकट उभे केले आहे. गहू, हरभरा या पिकाचे नुकसान झाल्याने शासन मदत करेल काय, या प्रश्नाने शेतकऱ्यांच्या मनात घर केले आहे.