बाजार समित्यांमधील प्रकार : अवकाळी पावसाने नुकसानीची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील ११ केंद्रांवर अद्याप दोन लाख ११ हजार ८३० क्विंटल तुरीची खरेदी व मोजणी होणे बाकी आहे. हवामान खात्याने दोन दिवसांत वादळासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. बाजार समित्यांमधील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांचा माल ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची तूर उघड्यावर आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तुरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शासनाने २२ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद केल्यानंतर जिल्ह्यातील केंद्रावर दोन लाख ७२ हजार १७० क्विंटलची तूर पडून आहे. अद्यापपर्यंत ६० हजार ३४० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. अद्याप दोन लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. मोजणीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचा माल उघड्यावर पडून आहे. केवळ काहीच शेतकऱ्यांना बाजार समित्यांमधील शेडमध्ये माल ठेवता आला. बहुतांश व्यापाऱ्यांचाच माल या ठिकाणी कित्येक दिवसापासून ठेवला आहे. बाजार समित्यांद्वारा शेतकऱ्याच्या तुरीविषयी गांभीर्यच नाही. याउलट व्यापाऱ्यांनाच नेहमी झुकते माप दिल्या जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात तिवसा व परिसरात दोनवेळा वादळासह पाऊस झाला. हवामान खात्यानेही येत्या दोन दिवसांत विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अनेक केंद्रांवर ताडपत्र्यादेखील अपुऱ्या असल्यामुळे तुरीचे नुकसान होत आहे. अमरावती बाजार समितीमध्ये ताडपत्रीची वानवाअमरावती बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची किमान ३० हजार क्विंटल तूर खरेदी व मोजणीसाठी पडून आहे. उघड्यावर असलेली तूर शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळील ताडपत्रीने जमेल तशी झाकली. बाजार समितीजवळ मात्र ताडपत्रीची कमतरता आहे. वास्तविकता ही जबाबदारी बाजार समितीची असताना नव्याने ताडपत्री खरेदी करण्यात आलेली नाही, जुन्या ताडपत्र्या खराब झाल्या आहेत.बाजार समितीमधील आवक, खरेदी सुरूचबाजार समित्यांमधील केंद्रामध्ये तुरीची मोजणी झपाट्याने व्हावी, यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे तीन दिवस व्यापाऱ्यांची खरेदी बंद ठेवावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. मात्र शुक्रवारी अमरावतीसह सर्वच बाजार समित्यांमध्ये आवक व व्यापाऱ्यांची खरेदी सुरूच आहे. दर्यापूर येथे काही काळ बाजार समितीचे गेट बंद करण्यात आले होते, अशी माहिती आहे. विदर्भात ९ मे पर्यंत तुरळक पावसाची शक्यतामध्यप्रदेश आणि विदर्भावर १.५ कि.मी. उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे व कर्नाटकपर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. राजस्थान, आसाम आणि बिहारमध्ये चक्राकार वारे वाहत आहे त्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण व ९ मे पर्यंत काही ठिकाणी हलक्या व वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.बाजार समितीच्या शेडमध्ये शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा माल ठेवला आहे. दोघांनाही सुविधा देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. नव्याने ताडपत्री खरेदी करायच्या आहेत. - भूजंगराव डोईफोडे,सचिव, अमरावती बाजार समिती
शेतकऱ्यांची तूर उघड्यावर, व्यापाऱ्यांची शेडमध्ये
By admin | Published: May 08, 2017 12:15 AM