अमरावती : रब्बी हंगामाची लगबग सध्या सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा कल गहू व हरभरा पेरणीकडे जास्त आहे. याशिवाय गळीत धान्य यामध्ये सूर्यफूल, जवस, तीळ व करडई या पिकांकडे पाठ असल्याचे दिसून येते. यंत्रणेची उदासीनता, शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा अभाव याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र या दशकात कालबाह्य ठरत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे जमिनीत आर्द्रता जास्त आहे. याशिवाय सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे रब्बीसाठी आठ ते बारा पाळ्यांमध्ये सिंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केलेले आहे. याशिवाय भूजलस्तरात वाढ झाल्याने विहिरींद्वारेही सिंचन होणार आहेत. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात किमान दहा टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र यामध्ये किमान ९० टक्के क्षेत्रात गहू व हरभराची पेरणी होत असल्याने अन्य पिके कालबाह्य ठरू लागली आहे.
विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे माहितीनुसार यंदाच्या रब्बी हंगामासाठी ७,२८,८४९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ५,६३,४०९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही ७७.३० टक्केवारी आहे.
ही आहेत कारणे
सिंचनासाठी अधिक पाणी लागणे, मजूर न मिळणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, हंगामात भाव पडणे, सामूहिक पेरणी होत नसल्याने पक्ष्यांचा उपद्रव, उत्पादन खर्च अधिक असणे, अवकाळीमुळे नुकसान याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
असे आहे तेलबियांचे क्षेत्र
विभागात सद्यस्थितीत करडईची १,०८८ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. याशिवाय जवस ४३ हेक्टर, तीळ ४७ हेक्टर, सूर्यफूल ४३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. खरीप हंगामातदेखील तेलबियांमध्ये फक्त सोयाबीन वगळता बाकी पिकांचे क्षेत्र देखील कमी झालेले आहे.
गहू, हरभराकडेच शेतकऱ्यांचा कल
विभागात सद्यस्थितीत ४,६०,१२८ हेक्टरमध्ये हरभरा व ८४,३५७ हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झालेली आहे. रब्बीत ९० टक्के क्षेत्र या दोन पिकांचे राहणार आहे. याशिवाय ज्वारी ८.०१८ व मक्याची ८,३०४ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. तेलबिया फक्त १,६३२ हेक्टरमध्ये आहे.