अमरावती : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दोन हजारांवर शेतकऱ्यांना विनाअट प्रोत्साहन योजनेचा लाभ द्या शिवाय शेतकऱ्यांना असहकार्य करणाऱ्या लिड बँकेच्या मॅनेजरला पत्र देण्याच्या मागणीसाठी अमित अढाऊ यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या दालनात ठिय्या दिला.
या योजनेतंर्गत जिल्ह्यातील दोन हजारावर शेतकऱ्यांची नावे मंजूर असतांना दोन वर्षापासून त्यांना ५० हजारांचा लाभ देण्यात आलेला नाही. काही शेतकऱ्यांच्या नावाची यादी सोसायट्यांद्वारा सहकार विभागाला पाठविली. या खात्याचे अंकेक्षण झाल्यानंतरही यादीत नावे आलेली नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत तीन याद्या प्रसिद्ध झाल्या मात्र यामध्ये पात्र शेतकऱ्यांची नावे गहाळ असल्याचा आरोप अढाऊ यांनी केला.
काही बँकानी शोतकऱ्यांचे अनुदान प्राप्त खाते होल्ड केले आहे. काही बँकांद्वारा पात्र असतांनाही शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाही. यासह अनेक शेतकऱ्यांवरील अन्यायाचा पाढाच अढाऊ यांनी वाचला. डीडीआर कुंभार यांनी सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली व पात्र लाभार्थ्यांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी प्रशांत शिरभाते, दिनेश आमले, मंगेश फाटे, स्वप्नील कोठे, प्रफुल्ल उमरकर,मंगेश हिरुळकर यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते.