लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नेहमीप्रमाणे यंदाही हवामान खात्याचा अंदाज चुकला. १० जूनला मान्सूनचे आगमन जिल्ह्यात झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर मान्सून जिल्ह्यात सक्रिय झालाच नाही. या आठ दिवसांत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडला. पावसाची ओढ असल्यामुळे जिरायती क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या. सद्यस्थितीत २१ टक्केच क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. मृगाचे वाहन असलेले गाढव बेभरवशाचे निघाल्याने शेतकऱ्यांची लबाड कोल्ह्यावर मदार आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कृषी विभागाद्वारे ६,९८,७९६ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्याच्या तुलनेत बुधवारपर्यंत १,५०,३४२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही टक्केवारी २१.५१ आहे. यामध्ये यंदा सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या सोयाबीन पिकाची ५२,२८५ हेक्टरवर पेरणी झाली, तर कपाशी ६७,७१७ हेक्टर क्षेत्रावर आहे. पावसाच्या खोळंब्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या क्षेत्रात फक्त कपाशीची पेरणी होत आहे. याव्यतिरिक्त सोयाबीनच्या कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. वानीसारखे कीटक कोवळ्या पिकांचा फडशा पाडत असल्याचे दिसून येत आहे.
सार्वत्रिक व नियमित पाऊस होईपर्यंत पेरणी करू नका, सोयाबीनची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
पावसाची स्थिती
अपेक्षित पाऊस : ११३.२ मिमी
झालेला पाऊस : १६६.० मिमी
सर्वांत कमी
धारणी तालुका : ८०.३ मिमी
सर्वांत जास्त
चांदूर रेल्वे तालुका २७५.२ मिमी
किती हेक्टरमध्ये पेरणी : १,५०,३४२ हेक्टर
सरासरी पेरणी क्षेत्र : ६,९८,७९६ हेक्टर
आतापर्यंत झालेली पेरणी : २१.५१ टक्के
तालुकानिहाय पेरणी व झालेला पाऊस
तालुका झालेला पाऊस मिमी पेरणी (हेक्टरमध्ये )
धारणी ८०.३ १,५९१
चिखलदरा १६९.४ १,०९४
अमरावती १६०.९ १५,५५९
भातकुली १६२.८ १,५३१
नांदगाव २२८.२ १३,५०९
चांदूर रेल्वे २७५.२ ८,०९३
तिवसा १६४.४ १४,९५९
मोर्शी १३०.१ १२,५१०
वरुड १०५.७ १०,८९३
दर्यापूर २०८.४ ५७२
अंजनगाव २२१.८ १६,६८१
अचलपूर १३८.२ ४,६४०
चांदूर बाजार १५९.० १२,८९६
धामणगाव २२०.१ ३५,८१०
पीकनिहाय क्षेत्र
सोयाबीन : २,७०,०००
कपाशी : २,५१,५४२
तूर :१,३०,०००
मूग :२०,०००
उडीद १०,०००
ज्वारी :२२,०००