अमरावती : रेल्वेचे प्रवासी आणि माल वाहतुकीची भाडेवाढ होऊन जेमतेम एक आठवडा होत नाही तोच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. दुसरीकडे पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. एकूणच शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे तर सामान्य जनता महागाईमुळे मेटाकुटीस आली आहे. तेल कंपन्यांनी प्रती लिटर पेट्रोलमागे १ रूपया ६९ पैसे तर प्रती लिटर डिझेलमागे ५० पैसे इतकी दरवाढ केली आहे. यात राज्य शासनाचे कर समाविष्ट नाहीत. करांसह यापुढे पेट्रोेलसाठी २ रूपये तर डिझेलसाठी ६० ते ७० पैसे अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. भाजीपाला आणि धान्याचे भावही कडाडले आहेत. शहरासह राज्यात कांद्यांचे दर प्रती किलो २८ रूपयांवर गेले आहेत. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असतानाच महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला सुध्दा या दरवाढीचा फटका बसेल. खासगी वाहतुकही महाग होईल. नव्या शासनाच्या अख्त्यारीतील ही पहिली पेट्रोल-डिझेल दरवाढ आहे. आता नागरिकांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा आहे.
पावसाअभावी शेतकरी तर महागाईने नागरिक त्रस्त
By admin | Published: July 02, 2014 11:09 PM