शेतातील रास्ता मोकळा करण्याचे प्रकरण;
पैशाची मागणी व मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप
तहसीलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न : तक्रारीची नोंद
चांदूर बाजार : स्थानिक तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत सचिन वाटाणे नामक शेतकऱ्याने शेतीच्या वहिवटीचा रस्ता मोकळा करून देण्यासाठी नायब तहसीलदारांच्या दालनात विष प्राशन करून सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सदर शेतकऱ्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या पत्नीने मंगळवारी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे. त्यात या अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
तालुक्यातील शेतकरी सचिन रामेश्वर वाटणे (४०) यांचे मौजे बेलोरा सर्व्हे क्रमांक १६७/२२ मध्ये १ हेक्टर ७९ आर शेती आहे. सदर शेती ही वडिलोपार्जित असून आजपर्यंत शेताची वहिवट याच रस्त्याने करीत आले आहेत. शेताचा वहिवटीचा रस्ता रमेश चुळे व सुरेश चुळे यांच्या शेत स.नं. १६७/२ मधून आहे. मात्र, त्यांनी या रस्त्यावर तारेचे कुंपण घालून रस्ता बंद केला. यासंबंधी तक्रार सचिनने २५ मे २०२१ रोजी चांदूर बाजार तहसीलदारांकडे केली होती. त्यात शेत पेरणीकरिता तात्पुरता रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली. शेत पडीक राहून आर्थिक नुकसान होण्याची शक्यताही व्यक्त केली होती. मात्र, आजपर्यंतही शेताचा रस्ता मिळाला नाही. त्यामुळे सचिन वाटणे यांनी नायब तहसीलदारांचा दालनातच विष प्राशन केले. यामुळे आपल्या पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल तसेच तहसीलदार धीरज स्थूल व नायब तहसीलदार देवेंद्र सवई यांना तोंडी विनंती करूनही, त्यांनी २० हजार रुपये द्या, तुमचा अर्ज मंजूर करतो, तुमच्या बाजूने निकाल देतो, असे सांगितल्याचे माझे पती वारंवार सांगत होते, अशी तक्रार शेतकरी सचिन वाटाणेची पत्नी प्रियांकाने पोलिसांत केली आहे.
सदर प्रकरण चौकशीत ठेवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.