मोर्शी : कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेला बळीराजा खतांच्या वाढीव किमतीमुळे अजून अडचणीत सापडला आहे. काही दिवसांत रासायनिक खतांच्या किमती वाढल्या असून, शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तर दुसरीकडे उत्पादनाचा खर्च वाढल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला असून, जिल्ह्यात मशागतीची कामे सुरू आहेत. गतवर्षी अतिपाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच खरीप हंगामाच्या तोंडावर खताचे दर सरासरी अधिकच वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. केंद्र शासनाने खतांच्या वाढविलेल्या किमती तात्काळ कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्यातर्फे करण्यात आली.
पुढील आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाने खतांच्या किमतीत प्रतीबॅग जवळपास ३५० ते ७०० रुपये वाढ केली आहे. आधीच महागाई वाढत आहे. त्यातच आता खतांच्याही किमती वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. या आठवड्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीने तर कहरच केला आहे. सध्या १०० रुपये प्रतिलिटर पेट्रोल, तर डिझेलही ९२ रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या विविध कामांची देखील भाडेवाढ झाली आहे. मशागतीसाठी लागणाऱ्या वाहनांचे दर डिझेल दरवाढीमुळे अडीच ते तीन हजार रुपयांनी वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे अत्याधुनिक पद्धतीने शेती मशागतीसाठी गतवर्षापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहे.
कोट १
यंदा पुन्हा रासायनिक खताचे दर वाढल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.
- रुपेश वाळके, उपाध्यक्ष राकाँ, मोर्शी
कोट २
खतांची दरवाढ झाल्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक शोषण सुरू आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून वाढलेल्या पेट्रोल - डिझेलच्या किमती व रासायनिक खताच्या किमती कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- नरेंद्र जिचकार, अध्यक्ष, राकाँ, मोर्शी