सुतारकामही जोरात, पालेभाजा, फळे उत्पादनावर भर, भातशेतीचा प्रयोग यशस्वी
अमरावती : हातून कळत नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रूपात प्रायश्चित करणाऱ्या येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी पिकवलेल्या शेतीतून १,१५० जणांना दोन वेळचे जेवणाचा भाजीपाला मिळत आहे. खुले कारागृहातील कैद्यांना शेतीकामासाठी नेमण्यात आले आहे. दररोज भाजीपाला उत्पादन घेत असताना ऋतुनुसार शेती करण्यात येत आहे.
कैद्यांना सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत त्यांच्या कौशल्यानुसार कामे सोपविली जातात. यात कुशल, अर्धकुशल व अकुशल अशा तीन वर्गवारीत कारागृहात कैद्यांच्या कामाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. येथील खुल्या कारागृहातील ३५ ते ४० कैद्यांवर शेतीकामाची जबाबदारी आहे. सकाळी ८ ते दुपारी १ वाजता दरम्यान नियमितपणे शेतीकामांवर कैदी कार्यरत असतात. कारागृहात बंदिस्त कैद्यांचे जेवण तयार करण्यासाठी दररोज लागणाऱ्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. ऋतुनुसार गहू, भातशेतीदेखील करण्यात येते. कांदा, बटाटे, वांगी, कोबी, पालक, कोथींबीर, मिरची, ढेमसे आदी पालेभाज्यांचे उत्पादन नियमित घेण्यात येते. कारागृहाच्या शेतीव्यतिरिक्त शासनस्तरावरून अन्नधान्याचा पुरवठा होतो. मसाले, अंडी, दूध, केळी, मांस आदी वस्तू या कंत्राटदारांकडून मागविल्या जातात.
---------------------
मध्यवर्ती कारागृहातील एकूण कैदी :११५०
पॅरोलवर बाहेर असलेले कैदी : ३४२
गंभीर गुन्ह्यातील कैदी : १२५
----------------
कोरोना काळात दीड कोंटीचे कामे
येथील मध्यवर्ती कारागृहात सुतारकाम, शिवणकाम, विणकामासह एलईडी दिवे तयार केले जातात. अमरावती येथील कैद्यांनी तयार केलेले एलईडी लाईट राज्यभरातील कारागृहात पाठविले जातात. विशेषत: कोविड हॉस्पिटलला बेड, जिल्हा आरोग्य प्रशासनाला मास्क तयार करून दिले आहे. यंदा कोरोना काळात कैद्यांनी तब्बल दीड कोटी रूपयांची कामे केल्याची माहिती कारागृहाचे अधिकारी पांडुरंग भुसारे यांनी दिली.
-------------
काय बनवले जाते?
- सतरंजी, दरी : कारागृहात वीणकाम अंतर्गत दरी, सतरंजी बनविल्या जातात. शासनाच्या मागणीनुसार त्या पाठविल्या जातात. हल्ली कारागृहाच्या ’उडाण’मॉलमध्ये त्या विक्रीसाठी उपलब्ध आहे.
- बेड, टेबल, देवालय : सुतारकाम अंतर्गत कैद्याच्या हातून तयार होणारे सागवान बेड, टेबल, देवालय आदी घरगुती वापराचे साहित्य बनवून विक्री केली जाते. शासकीय कार्यालयात फर्निचर तयार करून दिले जाते.
- एलईडी दिवे : राज्यात एकमात्र अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैदी एलईडी दिवे बनवितात. हे एलईडी दिवे इतर मागणीनुसार कारागृहात पाठविले जातात.
- मास्क : कोरोना काळात जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणेला मास्क पुरविण्याचे काम कैद्यांनी शिवणकाम अंतर्गत केले. लाखांच्यावर मास्क विक्री करण्यात आली.
--------------
पॅरोल नको रे बाबा
- कोरोना काळात कारागृहात गर्दी होऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने अटी, शर्तीवर कैद्यांची पॅरोलवर सुटका केली. मात्र, पोलिसांचा ससेमिरा लागल्याने पॅरोलपेक्षा कारागृह बरे, असा अनेकांना अनुभव आला.
- कारागृहातून सुमारे ३४२ कैदी पॅरोलवर गेले आहेत. अद्यापही हे कैदी पॅरोलवरच आहे. परंतु, घरी असताना बाहेर जाता येत नाही. समाज नाकारताे. पोलीस ठाण्यात सकाळ, सायंकाळ हजेरी लावावी लागते. या सर्व भानगडीने कैदी त्रस्त झाले आहेत.
---------
कारागृहात कैद्यांची दिनचर्या ही सूर्योदय ते सूर्यास्त अशी असते. यादरम्यान शिक्षाधीन कैद्यांना दैनंदिन कामे करावीच लागतात. काही जण जेवण तयार करतात, तर काही जण सुतारकाम, वीणकाम, शिवण काम, शेतीकाम करतात. काही कैद्यांना साफसफाईची कामे देण्यात आली आहे.
- रमेश कांबळे, अधीक्षक