गजानन मोहोड/ अमरावती: प्रलंबित विविध मागण्यांसाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे जिल्हा कचेरीवर गुरुवारपासून उपोषण सुरु आहे. यामध्ये शंभरावर आंदोलक सहभागी झाले आहेत. उपोषणाच्या चवथ्या दिवशी म्हणजेच रविवारी १४ आंदोलकांना चक्कर, उलटी व अशक्तपणा आल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आ. प्रताप अडसड व प्रकल्पग्रस्तांची चर्चा झाली. मात्र, रविवारी सायंकाळपर्यंत शासन प्रशासनाकडून कोणताही निर्णय आलेला नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिला आहे. रविवारी प्रशांत मुरादे, गलीबाई चव्हान, कविता राठोड, कैलाश तेलखडे, सुर्यभान कोठे, छाया झोड, विदूष गावंडे, महादेव चक्रनारायन, रानू राठोड,रंजना पाटील, रामरुषी सियाले, रानी तिडके, अनुसया नागले व शोभा दवंडे या प्रकल्पग्रस्तांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
या आहेत मागण्या६ जून २००६ च्या शासनादेशानुसार सरळ खरेदी पद्धतीने खरेदी करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीला सन २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळायला पाहिजे, पुनर्वसन कायद्यान्वये प्रकल्पग्रस्त कुटुंबाच्या व्यक्तीस सरळसेवा भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळायला पाहिजे. यासह अनेक मागण्या आंदोलनात करण्यात आलेल्या आहेत.