येवदा : ग्रामपंचायत सासन बु. येथील दोन दलित महिलांच्या कुटुंबांना ग्रामपंचायत सचिवाने वंचित ठेवल्याप्रकरणी न्याय मिळविण्याकरीता दलित समाजातील महिलांनी १७ ऑगस्टपासून सासन बु. ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणास सुरुवात केली होती. सासन बु. येथील घरकुल मंजुरी असलेल्या परंतु वीस वर्षे होऊनही जागा नावाने न झाल्याने घरकुल मंजूर झाल्यावरही या कारणाने यापासून वंचित असल्याने शेषकन्या रामदास वानखडे व लक्ष्मी रामदास धांडे या पात्र लाभार्थ्यांना ग्रामपंचायत सचिवाने वंचित ठेवल्याने त्यांनी ग्रामपंचायतीसमोर सभामंडप टाकून आमरण उपोषणास सुरुवात केली. आमरण उपोषण सुरू असताना दर्यापूर येथील खंडविकास अधिकारी रायबोले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेतली व तातडीने उपोषणकर्त्यांना लेखी कायमस्वरूपी जागा देऊन उपोषणाची लिंबू सरबत देऊन उपोषणकर्त्यांचा प्रश्न मार्गी लावला. यावेळी खंड विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायतीचे अधिकारी तसेच ग्रामसेवक नागे, येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमूल बच्छाव, कर्मचारी व अंकुश वाघपांजर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मधुकर आठवले व माजी सरपंच तसेच इत्यादी उपस्थित होते.
दलित महिलांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:16 AM