मागणी : समस्यांकडे दुर्लक्ष, वृद्धांचा आरोपतिवसा : दिव्यांग, अपंग, निराधार वृद्धांच्या विविध मागण्यांसाठी २ आॅक्टोबर गांधी जयंती दिनापासून राष्ट्रीय दिव्यांग जनकल्याण समिती तिवसाद्वारा पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण सुरू असून भरपावसात शेकडो वृद्ध अपंग न्यायासाठी उपोषणास बसले असल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. दिव्यांग, निराधार, वृद्ध यांच्या जाचक अटी रद्द करून बंद पडलेले मानधन पूर्ववत चालू करा, तिवसा तालुक्यातील दिव्यांग, निराधारांना विनाअट घरकूल द्या, दिव्यांग, निराधार, वृद्धांना ६०० रुपये मानधन ऐवजी २००० रुपये करणे व वृद्धत्वाचे वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करा, अपंगकल्याण व पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्यात आलेले ३ टक्के निधी वाटप करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू असून मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे सांगण्यात आले. अपंग वृद्धाची शासनाने फसवणूक केली असून जाणीवपूर्वक सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी सचिव हिरालाल मुंद्रे, रवींद्र धस्कट यांच्या नेतृत्वात शेकडो जण उपोषणास बसले आहेत. (शहर प्रतिनिधी)
अपंग, निराधार वृद्धांचे तिवसा ठाण्यासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2016 12:21 AM