श्रावणमास म्हटला की उपवासाचे दिवस. या महिन्यात शेंगदाणे, साबुदाणा, भगर, यासह इतरही वस्तूंचा वापर फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी वाढला असतो. पुरवठा कमी आणि मागणी अधिक याचा थेट परिणाम दरवाढीतून समोर आला आहे. शेंगदाणा, साबुदाण्याचे दर वाढले आहेत. श्रावणात उपवास महागला, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
श्रावण महिन्यात काही लोक संपूर्ण महिनाभर तर काही दर सोमवारी उपवास करीत असतात. चातुर्मास व्रतवैकल्य भक्तीभावाने भरभरून असणाऱ्या श्रावण महिन्यात यंदा मात्र शेंगदाणे साबुदाणा भगरीचे दर काहीसे वाढले आहे. श्रावण महिन्यात या वस्तूंच्या मागणीत दुपटीने वाढ होत असते. त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याचे व्यापारी वर्गांमध्ये बोलल्या जात आहे. श्रावण महिन्यात शेंगदाणे दहा, तर साबुदाणा किलोमागे पाच रुपयांनी वधारला आहे. भगरीच्या दरातदेखील वाढ झाली आहे. पेंडखजुराचे दर सध्यातरी स्थिर आहे. महादेव भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या महिन्यात ते आवर्जून उपवास करीत असतात. दिवसेंदिवस सर्वच वस्तूंची भाववाढ होत आहे. यंदा श्रावणातला उपवास महागला असेच म्हणावे लागेल. खाद्यतेल, साखरेची दरवाढ झाली आहे. भोजन असो की, उपवास लोकांना कसाही भाववाढीचा फटका सहन करावाच लागतो. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार हिरावले आहे. जवळ पैसा नाही, घर कसे चालवायचे, या विवंचनेत असताना महागाईने अधिक त्रस्त करून सोडले आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आवक घटली, मागणी अधिक
शेंगदाणे- श्रावण महिन्यात उपवासामुळे शेंगदाण्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. आवक घटली असून मागणीत प्रचंड वाढ झाल्याने यंदा शेंगदाण्याचे दर वाढले आहे. याचा ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने मालवाहतुकीच्या भाडेवाढीचादेखील महागाईवर परिणाम झालेला आहे.
* साबुदाणा- साबुदाण्याला तशी फारशी मागणी नसते. मात्र, उपवासात शेंगदाण्याचा जोड म्हणून साबुदाण्याकडे पाहिले जाते. शेंगदाणा, साबुदाण्यापासूनच चवदार उपवासाची उसळ बनविली जाते. श्रावण महिन्यात साबुदाण्याचे दरदेखील वाढले आहेत. भगरचे दर काहीसे वाढले आहे. या महिन्यात साबुदाण्याची विक्री वाढली आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
प्रतिक्रिया-
यंदाच्या श्रावण महिन्यात शेंगदाणा १०, तर साबुदाण्यात ५ रुपयांची दरवाढ झाली आहे. भगरचे दर किंचित वाढले आहे. या भाववाढीचा व्यवसायावर कुठलाच परिणाम झालेला दिसत नाही. विक्रीत उलट वाढ झाली आहे.
- अर्जुन सुने,
दुकानदार
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
* असे वाढले दर( एक किलोचे)
वस्तू। श्रावणाआधी आता
लाल शेंगदाणे। ११० रु। १२० रु
पांढरे शेंगदाणे। १०५ रु। ११० रु
साबूदाणा। ५५ रु। ६० रु
भगर। 96 रु। 100 रुपये
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^