दर्यापूर : दोन कार समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. दर्यापूर-अकोला मार्गावरील लासूर फाट्याजवळ सोमवारी दुपारी हा अपघात घडला. यात एका कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
आनंद बाहकर (वय २६, रा. सांगळूदकरनगर, दर्यापूर), विनीत गजानन बिजवे (३८, रा. गजानन मंदिर, साईनगर, दर्यापूर) व प्रतीक माधवराव बोचे (३६, रा. सांगळूदकरनगर, दर्यापूर) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात सकलेन आरिफ घाणीवाले (२४, रा. शिवाजीनगर, बनोसा), आकाश अग्रवाल व रमेश अग्रवाल हे जखमी झाले. (एमएच २७ डीई ६२६०) या कारने आनंद, विनीत, प्रतीक व पप्पू हे चौघेजण दर्यापूरहून अकोला येथे जात होते, तर (एमएच २९ बीसी ७७८६) या कारने आकाश अग्रवाल व रमेश अग्रवाल हे दर्यापूरकडे येत होते. लासूर फाट्यानजीक दोन्ही कार समोरासमोर धडकल्या. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती दर्यापुरात हवेसारखी पसरताच मित्र मंडळींनी अपघातस्थळ गाठले. तीनही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले. अग्रवाल पिता-पुत्रांना उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्यांनी पंचनामा केला. अद्यापपर्यंत या प्रकरणात प्राणांतिक अपघाताची नोंद झालेली नव्हती.