अमरावती : हौदात बुडून झालेल्या पित्याच्या मृत्यूप्रकरणी संशयित म्हणून मृताच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. ११ जून रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास हर्षराज कॉलनी येथे ही घटना उघड झाली होती. त्यात आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, २१ जून रोजी रात्री ८.४७ च्या सुमारास याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली. शवविच्छेदन अहवाल व मृताच्या पत्नीच्या तक्रारीचा आधार त्यासाठी घेण्यात आला.
तक्रारीनुसार, पद्माकर श्रीधर राऊत (वय ५४, हर्षराज कॉलनी, व्हीएमव्ही मागे) असे मृताचे नाव आहे, तर संशयित आरोपीचे नाव गौरव पद्माकर राऊत (२२, रा. हर्षराज काॅलनी) असे आहे. याप्रकरणी मृताची पत्नी मंदा पद्माकर राऊत (४७, रा. हर्षराज कॉलनी) यांनी तक्रार नोंदविली.
११ जून रोजी सकाळी पद्माकर राऊत यांचा मृतदेह घराच्या पाण्याच्या हौदात दिसून आला. घटना उघड झाली त्यावेळी पद्माकर यांचा मुलगा गौरव हा घरातून बेपत्ता झाला होता. गाडगेनगर पोलीस घटनास्थळी पोहोचून त्यांनी पंचनामा केला. तथा पद्माकर राऊत यांच्या घरातील सदस्यांकडून परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान, गाडगेनगर पोलिसांनी मृताचा मुलगा गौरव याची उलटतपासणीदेखील घेतली होती. दरम्यानच्या काळात मृताच्या पत्नीचे तथा गौरवच्या आईचा जबाब नोंदविण्यात आला. त्या घटनेच्या कालावधीत आपला मुलगा गौरव हा त्याचे वडील पद्माकर यांच्या सोबत घरातच होता. ते सोबत दारूदेखील प्याले, त्यादरम्यान आपल्या पतीचा खून हा गौरवने किंवा अज्ञात व्यक्तीने केला असावा, असा संशय मंदा राऊत यांनी व्यक्त केला. त्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी गौरव राऊत याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी आधी गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपास व मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून मृताच्या मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला मंगळवारी रात्रीच अटक करण्यात आली.
- आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगेनगर