अमरावती : येऊन जाऊन छेड काढणाऱ्या सासऱ्याविरूध्द अखेर सुनेने पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. सासऱ्याच्या त्या वासनांध वृत्तीला लगाम न घालता त्याच्या पत्नी व मुुलाने त्याला सहायच केले. १४ ऑक्टोबर पुर्वी खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी २८ नोव्हेंबर रोजी त्या विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती, सासरा व सासुविरूध्द विनयभंग, मारहाण व कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिर्यादी महिला ही लग्न झाल्यापासून पती व तिच्या दोन लहान मुलांसोबत सासरी राहत आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर ती गर्भवती असतांना सकाळच्या सुमारास घरी कोणीही नसतांना यातील तिचा ६० वर्षीय सासरा हा तिच्या जवळ येऊन बोलला. ते बोलने ऐकून तिच्या मनात लज्जा निर्माण झाली. त्या नंतर सुद्धा सासरा ती स्वयंपाक बनवित असतांना तिच्याजवळ येऊन तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. सासऱ्याच्या त्या विकृतीला कंटाळून ती पतीसोबत दुसरीकडे भाड्याने राहायला गेली. मात्र, तिथे तिचा पती तिच्यावर शंका घेऊन तिला मारहाण करत होता. तिला रात्री बेरात्री घराबाहेर काढून देत होता. त्यामुळे तिच्या माहेरकडील वडिलधाऱ्या मंडळीने मध्यस्थी करुन तिला परत सासू, सासऱ्यासोबत राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सुमारे चार महिन्यांपूर्वी ती पतीसह सासरी राहण्यास गेली.
पतीकडून जबरदस्ती
त्यानंतर देखील सासरा तिच्याकडे वाकडया नजरेने पाहत होता. ती आंघोळ करीत असतांना तो तिला खिडकीतून लपून बघायचा. ती एकटी घरी हजर असतांना अनेकदा त्याने सुनेचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यास तिला शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देत होता. दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी ती घरी एकटी असतांना सासऱ्याने पुन्हा एकदा तिच्याशी लगट केली. त्यामुळे तीने तेथून पळ काढला. विशेष म्हणजे सासरा घरी असताना सासू व पती घरातून निघून जायचे. तर बाबा जसे म्हणतात, तसे कर, यासाठी पती आपल्यावर जबरदस्ती करायचा, असे पिडिताने म्हटले आहे. तो छळ सहनशक्तीपलिकडे गेल्याने अखेर तिने पोलीस ठाणे गाठले.