लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा शहीद : लगतच्या पांढरघाटी शिवारात दिनेश दिलीप पाचपोहर (२८ रा. पेठ मांगरूळी) याच्यावर बापानेच शेतीच्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याचे पोलीस तपासात पुढे आले. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली होती. दोन दिवसांच्या उपचारानंतरही मुलाचे प्राण वाचले नाहीत. बेनोडा पोलिसांनी याप्रकरणी दिलीप भाऊराव पाचपोहर (५५, रा. खडका) या पित्याला अटक केली. पोलीस सूत्रांनुसार, पांढरघाटी शेतशिवारात पाचपोहर यांचे दोन एकर शेत आहे. आरोपी दिलीपला दोन पत्नी आहेत. एक माहेरी मांगरूळी पेठ येथे मुलगा दिनेशसह वास्तव्यास होती, तर तो स्वत: दुसऱ्या बायकोसोबत खडका येथे वास्तव्यास आहे. पहिल्या पत्नीचे खावटी आणि शेतजमिनीचे प्रकरण न्यायालयात सुरू होते. यादरम्यान शेतजमिनीच्या वादातून जन्मदात्याने मुलाला संपविण्याचा कट रचला. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी दिनेशला दिलीपने शेतात बोलावले आणि कुऱ्हाडीने त्याच्या मानेवर सपासप वार करून रक्तबंबाळ केले. यावेळी जखमीला तातडीने वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला हलविण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांनंतर २६ नोव्हेंबर रोजी जखमी मुलाचा मृत्यू झाला. बेनोडा पोलिसांनी भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला वरूड न्यायालयात हजर केले असता, त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप श्रीरावसह बेनोडा पोलीस करीत आहेत.
सहा महिन्यांचा असताना वडिलांपासून विभक्त आरोपी दिलीप हा दिनेश अगदी सहा महिन्याचा असताना पहिल्या पत्नीला सोडून गेला. दुसरे लग्न करून खडका येथे पत्नी व मुलाबाळांसह वास्तव्यास होता. पहिल्या पत्नीने न्यायालयात खावटीचे प्रकरण दाखल करून शेतजमिनीचा हक्क मिळावा, यासाठी कायदेशीर लढाई सुरु होती. यामध्ये न्यायालयाने शेतजमिनीचा ताबा पहिल्या पत्नीला दिला. ती शेती दिनेश आणि त्याची आई वाहत होते. हा राग मनात असल्याने अखेर शेतजमिनीच्या वादातून आरोपी पित्याने मुलाला संपविण्याचा कट रचला.
कोयत्याने मानेवर वार, दुचाकीवर मागितली ‘लिफ्ट’पेरणी केलेल्या गव्हाला पाणी देऊन गावी परतत असताना आरोपी बापाने मुलास बेनोड्यापर्यंत सोडून देण्याची विनंती केली. पांढरघाटीपासूनच तो हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. शेवटी बारगावजवळ ऐन राष्ट्रीय महामार्गावर लघुशंका आल्याची बतावणी करून त्याने मुलास दुचाकी थांबवायला लावली. षडयंत्रापासून अनभिज्ञ मुलगा दुचाकी रस्त्याच्या कडेला घेऊन स्टँडवर लावण्यासाठी झुकताच त्याच्या मानेवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मुलावर शर्थीचे उपचार करण्यात आले.