लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील एमआयडीसीमध्ये ट्रॅक्टरच्या वर्कशॉपवर चौकीदार म्हणून काम करणाऱ्या वृद्धाने आपल्या मुलाचे लग्न थाटामाटात लावून दिले. मुलाच्या हौसेत कमी येऊ नये म्हणून लग्नासाठी चक्क बचत गटाकडून कर्ज घेतले. हा आनंद फार काळ टिकला नाही. नवी सून घरात आली, मात्र तिला सासू-सासऱ्यासोबत नांदायचे नव्हते. तिने वारंवार सासऱ्याचा अपमान केला. त्यामुळेच सासऱ्याने पश्चात्तापाच्या भरात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
साहेबराव दवणे (६५) रा. पंचशीलनगर लोहारा असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी चार बचत गटाचे कर्ज उचलून मुलगा सूरज याचा विवाह करून दिला. नवीन सून घरात आली. तिने सासू-सासऱ्यांची सेवा करण्याऐवजी क्षुल्लक कारणावरून वाद घालणे सुरू केले. लग्नासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता भरू नये असा दबाव पतीवर टाकला. सासऱ्याला अश्लील शिवीगाळ करून तुम्हाला जेलमध्ये टाकतो, अशी धमकी दिली. यामुळे मानसिक धक्का बसल्याने साहेबराव दवणे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून गळफास लावून घेतला. सासऱ्याच्या मरणाला सून कारणीभूत असल्याने पोलिसांनी तिच्याविरुद्ध भादंवि ३०६, २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. संध्या सूरज दवणे (२२) ह.मु. पाचुंदा ता. माहूर जि. नांदेड असे त्या सुनेचे नाव आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास अवधूतवाडी पोलीस करीत आहे.