वरुड/बेनोडा (शहीद) : शनिवारी सकाळी मुलीच्या भेटीला बाप-लेक घरून पिपरी गणेशपूरला निघाले. बाप आणि भाऊ भेटीला आल्याने मुलगी आनंदी झाली. तो क्षणिक ठरला. कारण परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. दोघांचे कलेवर घरी येताच, माणिकपूर येथे आणताच, ग्रामस्थांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली. त्यांना सोमवारी अखेरचा निरोप दिला.
मृतक सुरेशसिंह मरसस्कोल्हे (७२) आणि मुलगा रामेश्वर मरसस्कोल्हे (४०) हे शनिवारी दुपारी १२ वाजता पिपरी गणेशपूर (ता.मोर्शी) येथे गेले होते. अतिवृष्टीच्या अनुदानातून मिळालेली रक्कम तीन मुलांमध्ये वितरित केल्यानंतर, काही रक्कम मुलीला देण्याचा त्यांचा मानस होते, शिवाय चार वर्षांपासून ते मुलीच्या घरी गेलेले नव्हते. भेटीगाठी आटोपून व मुलीची निरोप घेऊन सुरेशसिंह सायंकाळी निघाले. उमरखेड येथील भावाची भेट त्यांनी वेळेअभावी बस स्टँडवरच चहापानावर निभावली. थंडीमुळे गाव जवळ करीत असताना व ते हाकेच्या अंतरावर असताना काळाने डाव साधला. अज्ञात वाहनाच्या धडकेने बापलेकाचा जागीच मृत्यू झाला.
शवविच्छेदनानंतर दोघांचे कलेवर गावात येताच, कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. रामेश्वरची बायको लताचे आक्रंदन हृदय पिळवटणारे होते. एकाच वेळी बापलेकांना माणिकपूरवासीयांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
पोलिसांपुढे अज्ञात वाहन शोधण्याचे आव्हान
अमरावती ते पांढुर्णा मार्गाचे विस्तारीकरण झाल्यापासून वाहनांच्या वेगात कमालीची वाढ झाली आहे. तालुक्यातील महेंद्रीनजीक अमडापूर येथील तीन भविष्यवेत्त्यांना रेतीच्या टिप्परने चिरडल्याची घटना ताजी असतानाच हा अपघात झाला. बेनोडा पोलिसांपुढे बापलेकांना चिरडणाऱ्या वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान आहे.