अमरावती : वडिलांवर काकाने जादुटोणा केला होता. त्यामुळे आपल्या वडिलांची तब्येत ढासळत चालली होती, त्याचा राग मनात धरून आपण काकाचे हॉटेल वजा घर पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची कबुली आरोपी पुतण्याने दिली आहे. अनिकेत विनायक वानखडे (२३, रा. गौरखेडा) असे अटक आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेने २८ ऑगस्ट रोजी त्याला अटक केली. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी पंडितराव वानखडे यांच्या तक्रारीवरून २७ ऑगस्ट रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास खूनाचा प्रयत्न व आग लावून नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
खल्लार येथील पंडित प्रल्हादराव वानखडे (५१) यांचे खल्लार फाटयावर माऊली स्वीट मार्ट नावाचे हॉटेल आहे. ते परिवारासह हॉटेलच्या वरच्या मजल्यावर राहतात. २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्यादरम्यान घरात सर्वजन झोपले असतांना अज्ञात इसमाने त्यांच्या घरात पेट्रोल टाकून जिवे मारण्याचे उददेशाने आग लावली. त्यात त्यांचे संपुर्ण घर जळून ५.७० लाख रुपयांचेे नुकसान झाले. २७ ऑगस्ट रोजी रात्री १२.१५ च्या सुमारास तो प्रकार उघड झाला. यात फिर्यादी पंडितराव यांचा मुलगा जखमी असून, त्याला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
अशी दिली कबुली
याप्रकरणी खल्लार पोलिसांत दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीबाबत माहिती मिळाली. पंडितराव वानखडे यांचे घर त्यांचा पुतण्या अनिकेत वानखडे याने जाळल्याच्या माहितीवरून त्याला ताब्यात घेण्यात आले. प्रथम उडवाउडवीचे उत्तरे देणाऱ्या अनिकेतने पोलीस खाक्या पाहताच घटनेची कबुली दिली. काही दिवसांपुर्वी आपल्या वडिलांवर आपल्या काकाने जादुटोना केला होता. त्यामुळे वडिलांची तब्येत खराब राहत होती. याचा राग आपल्या मनात होता, सबब, आपण काकाच्या घरात पेट्रोल टाकून आग लावली. तथा त्यांना जिवाने मारण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली दिली.
यांनी केली कार्यवाही
पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधिक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी गुरूनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, व खल्लारच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक संजय शिंदे, अंमलदार सुधीर बावणे, निलेश डांगोरे, अमोल केंद्रे, विशाल हरने, परेश श्रीराव, अनुप देशमुख, गोपाल सोळंके, विजय निमखंडे यांनी ही कारवाई केली.