अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात पदव्युत्तर प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अवधी असून, अजूनही सहा हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाली नाही. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित तर राहणार नाही, अशी भीती वर्तविली जात आहे. गुरुवारी विद्यापीठात प्रवेशासाठी गर्दी होती.
एम.ए., एम.एस्सी., एल.एल.एम., एम.बी.ए. आदी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. प्रवेशप्रक्रिया २३ डिसेंबरपासून प्रारंभ झाली आहे. यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या सूचनेनुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती गठित करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित केला जात आहे. विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे तपासून ही पीजी प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण भवनात पार पाडली जात आहे. २५, २६ आणि २७ डिसेंबर असे तीन दिवस शासकीय सुट्या असल्याने विद्यापीठाचे कमकाज बंद राहील. पुन्हा २८ डिसेंबरपासृून प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ आहेत, त्यांना ऑनलाईन पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहावे लागेल, असे चित्र आहे.
-----------
कोट
गरज वाटल्यास प्रवेशाच्या जागा आणि प्रवेशाची तारीख निश्चितच वाढविण्यात येईल. कोणताही विद्यार्थी पदव्युत्तर प्रवेशापासून राहणार नाही, याची दक्षता विद्यापीठ घेणार आहे.
- राजेश जयपूरकर, प्र-कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.