जनावरांची संख्या घटतेय : शहरात केवळ १०-१५ खाद्यविक्रेतेमनीष कहाते अमरावतीजनावरे सांभाळणाऱ्या मजुरांचा तुटवडा आणि सततची चाराटंचाई, यामुळे पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरे विक्रीला काढली आहेत. त्याचा फटका शहरातील जनावरांच्या खाद्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना बसला आहे. शेतकरी म्हटले की, त्यांच्याकडे गाय, बैलजोडी, म्हैस, बकऱ्या, घोडे इत्यादी जनावरे असावीत, अशी आपली संकल्पना असते. परंतु गोठ्यातील या जनावरांची देखभाल करणे सहज सोपे नाही. त्यांच्या शेणगोठ्यासाठी मनुष्यबळ लागते. ग्रामीण भागात मजूर मिळत नसल्याने या पशुंच्या देखभालीची समस्या उभी राहते. याच कारणामुळे अलीकडच्या काळात शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे कमी केले आहे. काही शेतकरी बाजारात मिळेल त्या भावाने जनावरांची विक्री करीत आहेत. परिणामी शहरालगत आणि शहरातील पशुपालकांच्या भरवशावरच इतवारीतील पशुखाद्य विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हशी म्हटल्या की, दूध विकल्यावर महिन्याकाठी मिळणाऱ्या रकमेतून खाद्य विक्रेत्याची उधारी शेतकऱ्यांना चुकवावी लागते. ‘नगदी कमी उधार जास्त’ अशा अलिखित नियमानुसार इतवारीतील पशुखाद्य विक्रेते त्यांचा व्यवसाय करीत आहेत.ढेप, सरकी, तुरीची चुरी, मका चुरी, कडबा-कुट्टी हे जनावरांचे खाद्य आहेत. सद्यस्थितीत ढेप १४०० रुपये क्विंटल, तुरीची चुरी १३०० रुपये प्रति क्विंटल या दराने विकली जाते. शहरात विलासनगर, कॉटन मार्केट आणि इतवारा भागात पशुखाद्य विक्रेत्यांची दुकाने आहेत. म्हशीच्या दूध विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी देतील त्या रकमेवर खाद्यविक्रेते अवलंबून असल्याचे चित्र आहे. पशू खाद्यविक्रेत्यांना रोखीने हे खाद्य खरेदी करून पशुधारकांना उधारित द्यावे लागते. एखादी म्हैस मरण पावली किंवा तिने दूध देणे बंद केले तर त्याचा फटका थेट पशुखाद्य विक्रेत्याला बसतो. त्याची उधारी वसूल होत नाही. त्यामुळे हा व्यवसाय बेभरवशाचा झाल्याची ओरड इतवारीतील पशू खाद्यविक्रेत्यांनी सुरू केली आहे. सद्यस्थितीत दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे. शेतकऱ्यांच्या घरात कोणत्याच प्रकारचे धान्य नाही. त्यामुळे दैनंदिन खर्च कसा करावा, याच्या शोधात शेतकरी आहेत. अमरावती शहरात जरी शेतकरी नसला तरी परिसरातील शेतकऱ्यांवरच शहरातील पशू खाद्यविक्रेते अवलंबून आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस खाद्यविक्रेत्यांच्या दुकानांची संख्या कमी होताना दिसत आहे.जनावरांचे जास्तीत जास्त खाद्य शहरातील औद्योगिक वसाहतीत तयार होते. त्यामुळे दळवळणाचा खर्च कमी येतोे. म्हणून तुलनेत येथील बाजारपेठेत जनावरांचे खाद्य कमी दराने मिळत आहे. त्यामुळे खाद्यविक्रेत्यांना नफा कमी मिळतो, हे जरी खरे असले तरी पशुखाद्याची विक्री दुष्काळजन्य परिस्थितीमुळे होत नाही, हे वास्तव आहे. मी ५० वर्षांपासून दुधाचा व्यवसाय करीत आहे. ढेप खाऊ घातल्याशिवाय म्हैस दूध देत नाही. त्यामुळे महिनाभर उधारीवर ढेप आणावी लागते. जनावरांच्या देखभालीकरिता गडी माणसेदेखील मिळत नाहीत. - प्रकाश शिरसाट, रामगाव, पशुपालक.संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी वातावरण आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धंदा अर्ध्यावर आला आहे. जिल्ह्यात जनावरांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे धंद्यावर फरक जाणवतो. - अजय जैन,पशुखाद्य विक्रेते, विलासनगर, अमरावती.अमरावती शहराच्या आसपास असलेल्या पशुपालकांवर आमचा व्यवसाय अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी पाळीव पशुंची संख्या कमी केली. त्यामुळे धंद्यावर परिणाम झाला आहे.- सुनील देवाणी,ढेप विक्रेता, अमरावती.
पशुखाद्य विक्रेत्यांना दुष्काळाच्या झळा
By admin | Published: April 26, 2015 12:21 AM