५० टक्के साठा ठेवण्याचे आदेश, नंदनवनात दिवसाआड पाणी, हिवाळ्यातच करावी लागणार भटकंती
चिखलदरा : चिखलदरा पर्यटनस्थळासाठी महत्त्वपूर्ण सक्कर तलाव ५० टक्केच भरण्याचे आदेश असल्याने उन्हाळ्यापासून सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा मुसळधार पाऊस कोसळूनही दररोज झालेला नाही. हिवाळा लागताच येथील पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होण्याचे चित्र आहे.
इंग्रजकालीन सक्कर तलावात पावसाच्या पाण्याने दुसरीकडून वाहून जात होते. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासून एक कोटी रुपये खर्चून अचलपूर येथील उपकार्यकारी अभियंता मध्यम व लघु पाटबंधारे विभागामार्फत काम केले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात ५० टक्केच काम झाल्यामुळे पाणीसाठा जास्त न होऊ देण्याचे आदेशपत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला देण्यात आले आहे.
box
पाण्याचा विसर्ग सुरू, गंभीर स्थिती उद्भवणार
चिखलदऱ्याची लोकसंख्या पाच हजार असली तरी लाखोंच्या संख्येत पर्यटक येतात. त्यामुळे सक्कर तलाव अंतर्गत पाणीपुरवठा जानेवारी महिन्यापर्यंत केला जातो. त्यानंतर कालापानी साठवण तलाव आणि सहा किलोमीटर अंतरावरील आमझरी येथील बोअरवेलमधून एक दिवसाआड पुरवठा केला जातो. परंतु, सक्कर तलावाच्या अपूर्ण कामामुळे पन्नास टक्के भरण्याचे आदेश पाहता, यंदा चिखलदऱ्यात पिण्याच्या पाण्यासाठी ऑक्टोबरपासूनच भटकंती करावी लागणार असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
कोट
सक्कर तलाव दुरुस्तीचे काम करणाऱ्या संबंधित विभागामार्फत पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे पन्नास टक्केच पाणी ठेवून पुरवठा केला जाईल. हिवाळा व उन्हाळ्यात टंचाई भासणार आहे.
- विजय शेंडे, उपविभागीय अभियंता, जीवन प्राधिकरण, अंजनगाव
कोट
संबंधित तलावाचे काम ५० टक्के होणे बाकी आहे. जास्त पाणी साठवण केल्यास खोदकाम आणि लिकेजमुळे कुठलीच अप्रिय घटना होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पाणी साठवण ५० टक्के करण्याचे पत्र दिले आहे.
- सचिन पाल, उपकार्यकारी अभियंता, मध्यम व लघु पाटबंधारे विभाग