नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : अंधश्रद्धेच्या खाईत लोटल्या गेलेल्या मेळघाटातील महिला आजही प्रसूतीसाठी दवाखान्यात जायला तयार नाहीत. भीतीपोटी रुग्णालयातून एक गर्भवती महिला पळून गेल्याचा प्रकार चौथ्यांदा समोर आला आहे. चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या एका आदिवासी महिलेची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सिझेरियन करण्याच्या निर्णय घेतला. हे ऐकून पोट कापले जाणार या भीतीने गर्भवतीने रुग्णालयातून पळ काढत एसटीने गावी निघाली आणि थांब्यावर उतरताच प्रसूती कळा सुरू झाल्याने जंगलात रस्त्यावरच तिने एका बाळाला जन्म दिला. यावेळी रात्रभर तिथेच थांबून सकाळी एका शेतातील झोपडीत गेली.
हृदयाचा थरका बुडवणारी ही घटना तालुक्यातील खुटीदा येथे बुधवारी घडली. कविता दिनेश धिकार (२८ रा खुटीदा) असे आदिवासी महिलेचे नाव असून, ती चौथ्यांदा गर्भवती होती. प्रसूतीचे दिवस जवळ आल्याने हातरू प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला दाखविण्यात आले. तिथून चुरणी ग्रामीण रुग्णालयात तिला रेफर करण्यात आले होते. तिच्यासोबत आदिवासी दाईदेखील होती. चुरणी येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर प्रसूतीच्या कळ्या येत नसल्याने व बाळ आणि मातेच्या आरोग्याचा विचार करीत डॉक्टरांनी सिझेरियन करण्यासाठी तिला अचलपूर किंवा अमरावती येथे रेफर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय ऐकताच तीने रुग्णालयातून पळ काढळा.
पोट कापतील या भीतने पळाली
डॉक्टरांनी प्रसूती होत नसल्याने सिझेरियन करण्यासाठी म्हटल्याने आपल्याला तेथून अचलपूर व अमरावती येथे पाठविल्या जाणार त्यात पोट कापणार अशा एक ना विविध शंका कुशंका व भीतीने सदर महिलेने दाईसह कोणालाही न सांगता चुप-चाप रुग्णालयातून पळ काढला. परतवाडा भांडूम बस गाडीने ती गावी निघाली सायंकाळी सात वाजता गाव फाट्यावर ती उतरली होती.
खराब रस्ते अन् जंगलात प्रसूती
खुटिदा गावाकडे ज्या मार्गाने एसटीबस जाते त्या मार्ग पूर्ण खड्डेमय आहे. त्यामळे परिणामी तिला प्रसूतीच्या कळा आल्यावर बसमधून उतरताच काही वेळात जंगलातच प्रसूत झाली. रात्र जंगलात काढून सकाळी नजीकच्या मुन्सी भय्या यांच्या शेतात त्यांना आश्रय देण्यात आला. सदर बाब माजी उपसभापती नानकराम ठाकरे यांना समजताच गुरुवारी सकाळी त्यांनी आरोग्य यंत्रणेला माहिती दिली. तिच्या प्रकृतीची दखल घेत रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
आरोग्य यंत्रणेची पोलिसांत तक्रार
कविता धिकार ही महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल असताना अचानक निघून गेल्याने चुरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने पोलिसांत त्याची माहिती देण्यात आली. परंतु मेळघाटातील आदिवासी महिलांमध्ये पूर्वीच घरी प्रसूतीचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा धडपडत असताना त्यांच्या मनातील भीती कमी करण्याचे काम अजूनही अपूर्णच आहे.
गर्भवती आदिवासी महिला प्रस्तूतीसाठी चुरणी रुग्णालयात हातरू प्राथमिक आरोग्य केंद्रातून पाठविण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी करून सिझेरियनचा निर्णय घेतला. परंतु महिला निघून गेली तशी पोलिसांना माहिती सुद्धा दिली आहे. पुढील तिच्या आरोग्याच्या दृष्टीने तिची समजूत काढून बाळ व तिला उपचारार्थ कसे आणता येईल याचे प्रयत्न सुरू आहे.
- रामदेव वर्मा, वैद्यकीय अधिकारी, चुरणी ग्रामीण रुग्णालय