वरूड (अमरावती) : तालुक्यातील सावंगी येथील विधवा महिला शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून तिला ठार केले. दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शेतातील कामे आटोपण्यासाठी ती एकटीच शिवारात मागे राहिली होती.
सूत्रांनुसार, प्रमिला राजेंद्र भाजीखाये (४५, रा. सावंगी जिचकार) असे मृत महिलेचे नाव आहे. मौजा मुसळखेडा शिवारात त्यांचे शेत आहे. त्या नियमित शेतात सकाळी जाऊन दुपारी परत यायच्या. सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शिवारात असलेल्या इतर शेतकरी व मजुरांनी त्यांना काम थांबवून घरी चालण्यास सांगितले. तथापि, हातातील काम पूर्ण करूनच परत येते, असे म्हणत त्यांनी त्यांना निरोप दिला. दुपारी साडेतीन वाजता प्रमिला यांचा मुलगा शेतात गेला असता, त्याला आई मृतावस्थेत दिसली. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. ही माहिती ग्रामस्थांना मिळताच सर्वांनी शेताकडे धाव घेतली. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली.
वनाधिकारी पुष्पलता बेंडे, वनपाल भारत अळसपुरे, अजय खेडकर, विनोद गिरुळकर, वनरक्षक नावेद काझी, आकाश मानकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रमिला भाजीखाये यांच्या जखमांवरून हल्ला करणारा पशू अस्वल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वरूड पोलिसांनीही घटनास्थळाचा पंचनामा करून सायंकाळी ६ वाजता मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
शेतकरी-मजुरांमध्ये भीती
अस्वलाने मनुष्याला ठार केल्याची वरूड तालुक्यातील ही पहिली घटना आहे. याआधीही सावंगी शिवारात एका अस्वलाने दर्शन दिले होते. यामुळे शेतकरी-मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी जंगलात जाताना सावधगिरीने जावे. एकटे जाऊ नये. सोबत काठी ठेवावी. वन्यप्राणी दिसल्यास तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पलता बेंडे यांनी केले आहे.
कुटुंबीय सैरभैर
प्रमिला भाजीखाये यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्याच शेती सांभाळत होत्या. त्यांचा मोठा मुलगा अभियांत्रिकीला आहे, तर धाकटा माध्यमिक शाळेत आहे. याशिवाय अंध सासऱ्याचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. हे कुटुंब आता सैरभैर झाले आहे.