प्रवाशांचे आरोग्य धोक्यात : रेल्वे पोलिसांची वसुली जोरातअमरावती : रेल्वे गाड्यांमध्ये महिलांकडून अनधिकृत खाद्यपदार्थ विकले जात आहेत. या व्यवसायासाठी महिलांची टोळी सक्रिय असून या टोळीला रेल्वे पोलिसांचे अभय असल्याचे चित्र आहे. महिलांच्या एका टोळीच्या अधिनस्थ किमान ८ ते १० युवक कार्यरत आहेत. नागपूर ते भुसावळ दरम्यान अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यवसायात महिलांचाच वरचष्मा आहे.रेल्वे गाड्यात भिकारी, खिसेकापू, चोरटे आणि तृतीयपंथीयांचा हैदोस ही नित्याचीच बाब झाली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणे असुरक्षितेची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, आता अनधिकृत खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेक महिला गँग सक्रिय झाल्या आहेत. रेल्वे स्थानक ते गाडीपर्यंत या महिला गँगचे अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीचे अड्डे आहेत. चहा, कॉफी, भेळ, फळे, पाणी, नाश्ता, गुटखा, सिगारेट आदी साहित्याची विक्री या महिला गँगकडून केली जाते. गँगचे अनधिकृत खाद्य पुरवठा करण्याचे केंद्र अकोला, वर्धा, नागपूर व बडनेरा रेल्वे स्थानक हे आहे. यापैकी काही महिला गँग बनावट तृतियपंथीय तयार करून त्यांच्यामार्फत रेल्वे गाड्यांमधून प्रवाशांकडून पैसे उकळण्याचा धंदा चालवितात. बनावट तृतीयपंथी प्रवाशांकडून पैसे मागण्यासाठी प्रसंगी अश्लिल चाळे करतात. त्यामुळे काही प्रवासी बनावट तृतीयपंथीयांकडून बचाव करण्यासाठी त्यांच्या मर्जीप्रमाणे पैसे देखील देतात. अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री असो वा भिकारी अथवा बनावट तृतीयपंथी या सर्वांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. परंतु रेल्वे पोलीस या महिला गँगकडून बांधलेले हप्ते घेत असल्याने कारवाई केली जात नाही. अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रीसाठी लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना प्राधान्य देण्यात येते. रेल्वे सुरक्षा दलाने गाडीनिहाय या महिला गँगकडून रक्कम ठरविल्याची माहिती आहे. बडनेरा ते वर्धा, अकोला ते बडनेरा व नागपूर ते वर्धा, अकोला ते भुसावळ या प्रवासा दरम्यान अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या महिला गँग सक्रिय असल्याचे वास्तव आहे. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या आशीर्वादाने रेल्वे गाड्यांमध्ये हा प्रकार सुरु असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चोरीच्या घटना वाढल्यारेल्वे गाड्यात अलिकडे खिसेकापू, मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या महिला गँगसोबत युवकांची टोळी राहात असल्याने या युवकांच्या माध्यमातून रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांच्या साहित्य, सामानाची चोरी होत असावी, असा अंदाज आहे. मोबाईल चोरीच्या घटनांनी अलिकडच्या काळात कहर केला आहे. रेल्वे पोलिसांकडून एकही चोरीची घटना उघडकीस आली नाही, हे विशेष.रेल्वे सुरक्षा दल ‘नॉट रिचेबल’रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीसाठी महिलांची टोळी कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमिवर बडनेरा रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी आर.के.मीना यांच्याशी संपर्क साधला असता ते ‘नॉट रिचेबल’ होते. वारंवार संपर्क साधुनही याविषयी बोलता आले नाही. रेल्वेत तृतीयपंथी, अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री, भिकाऱ्यांचा सुरु असलेला हैदोस थांबविण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून केली जात आहे.
रेल्वेत खाद्यपदार्थ विक्रीसाठी ‘महिला गँग’
By admin | Published: September 03, 2015 12:10 AM