फोटो पी २३ भूगाव
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील भूगाव येथील स्मशानभूमीवर एका शेतकऱ्याने स्वतःची जागा असल्याचा दावा करीत कुंपण घातल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकाराने आता अंत्यसंस्कार करायचा कुठे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी तक्रार दाखल केली.
भूगाव येथे सन २०१७-१८ या वर्षात स्मशानभूमीचे शेड, हातपंप व इतर काम करण्यात आले. जिल्हा परिषदेतील तत्कालीन अध्यक्षांसह नेत्यांनी या स्मशानभूमीचे उद्घाटनही केले. परंतु ज्या जागेवर ही स्मशानभूमी उभारण्यात आली ती जागा ई-वर्ग आहे किंवा शेतजमीन, हे न पाहता काम करण्यात आले. आणि अचानक एका शेतकऱ्याने स्मशानभूमीच्या जागेवर स्वतःचा हक्क दाखविला आणि तार कुंपण घातले आहे.
बॉक्स
संबंधितांवर गुन्हे दाखल करा
ग्रामपंचायत अंतर्गत तीन वर्षांपूर्वी स्मशानभूमीचे बांधकाम करताना संबंधित तत्कालीन सरपंच, सचिव व पंचायत समिती शाखा अभियंता यांनी संबंधित जागेच्या कागदपत्रांची तपासणी न करताच बांधकाम केले का, असा प्रश्न उपस्थित करीत शासकीय निधीचा खर्च करताना कुठल्याच प्रकारे काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे हा गंभीर प्रकार उद्भवला असल्याची तक्रार भूगाव ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल लादे, प्रफुल्ल काळे, वर्षा कडू, संगीता शिंगणे यांनी अचलपूर पंचायत समितीचे बीडिओ यांना शुक्रवारी केली.
बॉक्स
तीन वर्षांनंतर का घातले कुंपण?
स्मशानभूमीचे बांधकाम करण्यापूर्वी संबंधित तलाठी यांना बोलावून जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. त्यांनी सांगितलेल्या जागेवरच नंतर स्मशानभूमीचे काम करण्यात आले. तीन वर्षांपासून येथे अंत्यविधी केले जात असताना आता संबंधित शेतकऱ्याने हक्क दाखवून कुंपण घातले. यासंदर्भात आपण सुद्धा माहिती घेणार असल्याचे माजी सरपंच वृषाली कडू यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कोट
भूगाव ग्रामपंचायतच्या स्मशानभूमी संदर्भात तक्रार प्राप्त होताच त्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- जयंत बाबरे,
बीडीओ, पं. स. अचलपूर