लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन आठवड्यांवर आलेल्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली. चार वर्षांपासून सलग नापिकी, नैसर्गिक आपत्ती यामुळे उत्पादन खर्चही पदरी पडलेला नाही. आता पुन्हा उत्पादन खर्चात वाढ होणार असल्याने हमीभावात वाढ केव्हा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.वास्तविकता मागच्या हंगामापासून सुरू असलेला कोरोना संकट काळ सध्याही सुरूच आहे. त्यात लॉकडाऊन यासोबतच बियाणे, रासायनिक खतांच्या किमती वाढल्या. डिझेल दरवाढीने टॅक्टरद्वारे मशागतीचा खर्च वाढला. या सर्व विपरीत परिस्थितीत उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व शेतीचे नियोजन करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून रासायनिक खतांची ५०० ते ७०० रुपयांपर्यंत दरवाढ करण्यात आलेली आहे. युरिया वगळता अन्य कुठल्याही खतांच्या किमतीवर केंद्र शासनाचे नियंत्रण नाही. खरिपात मोठी मागणी असलेल्या डीएपीच्या किमती कमी करण्यासाठी राज्य शासनाद्वारा केंद्राला विनंती केल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी अमरावती जिल्हा दौऱ्यात सांगितले. मात्र, अद्याप किमती कमी करण्यात आलेल्या नाहीत. खत निर्मितीसाठी आवश्यक सल्त्युरिक, फॉस्परिक ॲसिडच्या किमतीत वाढ झालेली आहे. चीनसह अन्य देशातून होणारी कच्च्या मालाची निर्यात सध्या बंद असल्याने रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याचे खते मंत्रालयाच्या हवाल्याने कृषी विभागाने सांगितले. दरम्यान जिल्ह्यांध्येही खतांच्या दरवाढीवरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. याशिवाय महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांद्वारे शासनाला निवेदन पाठविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील संचारबंदी उठताच या दरवाढीविरोधात चांगलेच रान पेटण्याचे संकेत आहेत.
जुन्या खतांच्या विक्रीवर भरारी पथकांचा वॉच विक्रेत्यांकडील जुन्या खतांची विक्री जुन्याच दराने करण्याचे विक्रेत्यांना अनिवार्य केले आहे. ही विक्री पॉस मशीनद्वारे करावी लागणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. वाढीव भावाने विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास त्या विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. या विक्रीकर जिल्ह्यातील १६ भरारी पथकांची नजर राहणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे यांनी सांगितले.
१८८९० मे.टन खतांची मागणीयंदाच्या खरीप हंगामासाठी १,०८,८९० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यामध्ये २९,४४० मेट्रिक टन युरिया, डीएपी २४,३९० मेट्रिक टन, एमओपी ७,२६० मेट्रिक टन, संयुक्त खते २४,३०० मेट्रिक टन, एसएसपी २३,५०० मेट्रिक टन खतांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७,६३५ मेट्रिक टन खतांची विक्री झालेली असल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ३०,५९७ मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे.
२३,६९० मे.टन खतांची जुन्याच भावाने विक्री अनिवार्य जिल्ह्यात सद्यस्थितीत मागिल वर्षीचा २३,८९० मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक आहे. हा साठा जुन्याच भावाने विकावा लागणार आहे. यामध्ये युरिया ४,८७२, डिएपी ४,०३३, संयुक्त खत ७,३६९, एसएएसपी ५,४७७, अमोनियम सल्फेट ३१४, एमओपी १,१२८ व मिश्रखते ४९७ मेट्रिक टन असा खतांचा साठा शिल्लक असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी यू.आर. आगरकर यांनी सांगितले.