१९ एप्रिलपर्यंत विक्रेत्यांना प्रशिक्षण : ‘आधार’ ओळख पटविल्यावर मिळणार खतअमरावती : जिल्ह्यात १ जून २०१७ पासून रासायनिक खतविक्रीकरिता थेट लाभ हस्तांतरण योजना राबविण्यात येत आहे. याकरिता जिल्ह्यातील १००२ खत विक्रेत्यांना ‘पीओएस’ मशिन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या मशिनद्वारे आधार क्रमांकाची ओळख पटवून शेतकऱ्यांना खतांची खरेदी करता येईल.जिल्ह्यात १ जूनपासून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रकल्प राबविण्यात येत आहे. आतापर्यंत खत उत्पादक कंपन्याद्वारा केलेली खतनिर्मिती केली व विक्रीकेंद्रांना वितरित केलेल्या खतानुसार अनुदान देण्यात येत होते. परंतु आता खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येनुसारच अनुदान खत कंपनीला मिळणार आहे. यासाठी नोंदी करण्यासाठी अनुदानित खतांची प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या १००२ विक्रेत्यांना ‘पीओएस’ मशिन ‘आरसीएफ’ या खत कंपनीच्या माध्यमातून या महिन्यात वितरित करण्यात आल्या आहेत. केंद्राच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी आधार कार्डाचा वापर करावयाचा आहे. खरेदीदार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, त्यास आवश्यक खताचे विवरण यानोंदी खतविक्रेत्याद्वारा पीओएस मशीनवर उपलब्ध करण्यात येणार आहेत. या नोंदीसाठी खरेदीदार शेतकऱ्याला हाताच्या बोटाचा ठसा मशिनवर द्यावा लागणार आहे. हे मशिन सिमकार्ड, इंटरनेटद्वारे आधार लिंक करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची ओळख पटल्यानंतर त्यांना खतखरेदी करता येईल. काही कारणास्तव शेतकरी स्वत: हजर राहू न शकल्यास दुसऱ्या व्यक्तीसदेखील खत खरेदी करता येईल. मात्र, त्या व्यक्तीजवळ त्याचे व ज्याच्यावतीने तो खत खरेदी करणार आहे, त्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)थेट लाभ हस्तांतरणाचा ‘डीबीटी’ प्रकल्प जिल्ह्यात १ जूनपासून राबविण्यात येत आहे. १००२ खतेविक्रेत्यांना ‘पीओएस’मशीन उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या विक्रेत्यांचे तालुकानिहाय प्रशिक्षण सुरू आहे.- उदय काथोडे, कृषी विकास अधिकारी
एक हजार पीओएसद्वारे खत विक्री
By admin | Published: April 18, 2017 12:28 AM