अमरावती : सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा, नगरपंचायतीसह इतर निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अद्याप रणधुमाळी जाहीर झाली नाही तरी इच्छुकांकडून आतापासूनच फिल्डिंग लावणे सुरू झाले आहे.
निवडणूक रणधुमाळीला अद्याप काही दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी आतापासूनच इच्छुकांनी गण व गटात जनसंपर्क वाढविणे सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर इच्छुकांचा प्रचार बरसण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाची उमेदवारी मिळण्याबरोबरच अपक्षही लढविण्याची तयारी इच्छुकांनी सुरू केली आहे.आगामी निवडणुकांत इच्छुकांची चांगलीच गर्दी होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या साऱ्या वातावरणामुळे राजकीय डावपेचही आखणे सुरू झाले आहेत. सभांचे फड, प्रचार सभांच्या प्रसंगी रंगतीलच पण पूर्वतयारी म्हणून इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीची लढाई मैदानात लढली जाते. तितकीच तिची रणनीती राजकीय पक्षांच्या वॉररूमध्ये देखील तयार केली जाते. उमेदवारांच्या प्रचारासाठी होणाऱ्या नेत्यांच्या सभा, दौरे, स्टार प्रचारक, विरोधकांकडून होणारे हल्ले तत्काळ परतून लावणे, मतदार याद्यांपासून मीडिया ब्रेकिंगपर्यंत सबकुछ या वॉररूममध्ये तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच हक्काचा प्रचार स्टार ठरणार असल्याने राजकीय पक्ष, इच्छुकांनी जोरदार तयारी केली असून त्याची रंगीत तालीम सुरू आहे. लवकरच या ट्रेलरचे चित्रपटात रूपांतर झालेले मतदारांना दिसणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
बॉक्स
उमेदवारीसाठी लाॅम्बिंग
स्थानिक पातळीवर बडे नेते आघाडी, युतीचा निर्णय घेतील पण पक्षाने आपल्याला तिकीट नाही दिले तर बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढण्याची खूणगाठ सर्वच पक्षांतील इच्छुकांनी केली आहे. त्यादृष्ट्ीने त्यांनी मोर्चेबांधणी जवळपास सुरू केली आहे. आपल्या पक्षाला जागा सुटणार की नाही याचबरोबर आपल्याला उमेदवारी मिळविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू झाले आहेत.