अमरावती - मांडूळ सापाची तस्करी प्रकरणात दर्यापूर पोलिसांनी चार आरोपींना गजाआड केले होते. यातील पाचव्या आरोपीलाही अटक करण्यात दर्यापूर पोलिसांना सोमवारी यश मिळाले. शेख नासीर शेख बसीर (३५, रा. अकोला) असे अटक आरोपीचे नाव असल्याची माहिती दर्यापूर पोलिसांनी दिली. मांडुळ सापाचा अडीच कोटी रुपयांत सौदा होण्यापूर्वी मुंबई वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो, मेळघाट वाइल्ड लाइफ क्राइम सेल व अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत चार आरोपींना अटक केली. त्यामध्ये अब्दुल हनीफ अब्दुल हबीब (३६), गौर शाह कादर शाह (४६), अफजल हुसेन अली रियाज अली ऊर्फ चाचा (५९ तिघेही रा. अकोट फैल, अकोला) व तसलीम शाह तुकमान शाह (३५, रा. चौहोट्टा बाजार, जि.अकोला) या आरोपींचा समावेश आहे. दर्यापूर पोलिसांनी पाचही आरोपींना तेथील न्यायालयात हजर केले. त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मांडुळ साप तस्करीचे धागेदोरे कुठपर्यंत जुळले आहेत, त्यांना सापाची विक्री करणारा कोण, घटनास्थळावरून पळून जाणारे दोन आरोपी कोण, अशा विविध दृष्टीने दर्यापूर पोलीस तपास करीत असल्याची माहिती ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी दिली.
मांडूळ तस्करी प्रकरणी पाचवा आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 7:21 PM