अमरावती : बालकांना योग्य वयात योग्य ती धडे दिली तर ते कोणतीही गोष्ट चांगल्या पद्धतीने करतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण होते नेमकी हीच बाब लक्षात घेता. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील २ हजार ५०० अंगणवाडी केंद्रातून जवळपास ५० हजार बालकांनी बुधवारी अंगणवाडी केंद्रात योगाचे प्रात्यक्षिके करून ग्रामस्थांचे लक्ष वेधले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रात योग प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. त्यानिमित्त प्रत्येक ठिकाणी योगाची प्रात्यक्षिके पाहायला मिळाली. कोणतेही गोष्टीचे बाळकडू जर बालपणापासून मिळाले, तर ते कायमचे बालकांच्या मनावर कोरले जातात. यावर्षी प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये योगांचे प्रात्यक्षिके व्हावे यादृष्ट्रीने महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी सूक्ष्म नियोजन केले होते. याबाबत अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना योगाचे काही व्हिडिओसुद्धा पाठवण्यात आले.
अंगणवाडी केंद्रातील बालके योगाचे प्रात्यक्षिके उत्तम प्रकारे साजरी करतील आणि त्यांच्या आई-वडिलांनासुद्धा योगाचे धडे देतील, हा यामागचा उद्देश होता. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि विस्तार अधिकारी,डेप्युटी सीईओ अंगणवाडी केंद्रात प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभागी झाले आहे. जिल्ह्यातील २५०० अंगणवाडी केंद्रात तीन ते सहा वर्ष या वयोगटातील ५० हजार बालकांसहित योगाचे प्रात्यक्षिके साजरे केले. यावेळी काही अंगणवाडी केंद्रामध्ये किशोरवयीन मुली, माता आणि पालक सुद्धा सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रात सेविकांच्या नेतृत्वाखाली योग दिनाचे आयोजन केले होते. यामध्ये चिमुकल्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हे बाळकडू त्यांना भविष्यातही उपयुक्त ठरतील असा मला विश्वास आहे.
- डॉ कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती