अमरावती : चित्रपटगृहात सिनेमा पाहणं प्रत्येकालाच आवडतं, त्यातही आवडती सीट मिळाली तर आनंद द्विगुणित होऊन जातो. पण, कधी-कधी जागेवरुन वादही उद्भवतात. असाच काहीसा किस्सा परतवाड्यात घडला आहे. जागेच्या वादावरून झालेली बाचाबाची क्षणात मारहाणीत बदलली आणि लोकांना सिनेमात होते तशी फायटिंगचा आनंद डोळ्यादेखत अनुभवायला मिळाला.
सिनेमा रंगात येण्यापूर्वीच शहरातील श्याम टॉकीजमध्ये जागेच्या वादातून मारहाण झाली. यात सिनेमा मध्येच थांबवावा लागला आणि पोलिसांना बोलवावे लागले. परतवाड्यात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
टॉकीज प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. अल्लू अर्जुन अभिनित चित्रपटाचा हा पहिलाच दिवस. पहिल्याच दिवशी सिनेमा हाऊसफुल्ल. रात्रीच्या खेळाला मद्यपी अवतरले. अंधारात ते आपल्या जागेपर्यंत पोहोचले. पण, त्यांना त्यांच्या जागेवर दुसरे प्रेक्षक बसल्याचे दिसले. त्या जागेसाठी त्यांनी हट्ट धरला. थोडी बाचाबाची झाली आणि त्या अंधारातच मारहाणीला प्रारंभ झाला. पडद्यावर येऊ घातलेल्या मारहाणीपूर्वी प्रेक्षकांना ही लाईव्ह फाईट बघायला मिळाली. टॉकीजमधील अंधारात या लाईव्ह फायटिंगचा प्रेक्षकांनी चांगलाच आस्वाद घेतला.
टॉकीजमधला गोंधळ लक्षात येताच व्यवस्थापकांनी सिनेमा थांबवला आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांचा शोध घेतला, पण ते त्यापूर्वीच अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. नंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला.